कोथरूडमध्ये अनोख्या पद्धतीने मतदानाबाबत जनजागृती ; विवाह सोहळ्यात उपस्थितांकडूनही घेतली मतदान करण्याची शपथ.
कोथरूड : कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने परिसरातील व्यवसायिक, सिग्नलवर थांबलेले चार चाकी, दुचाकी स्वार, पीएमपीएल.बस प्रवासी तसेच विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या नातेवाईकांमध्ये जाऊन मतदान करण्याबाबत अनोख्या पद्धतीने जनजागृती केली.
कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या घनकचरा व आस्थापना विभागाच्या वतीने प्रभाग क्रमांक १२, डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण परिसरातील व्यवसायिक क्षेत्रात प्रत्यक्ष जाऊन व्यवसायिक तसेच रस्त्याने जाणारी येणारी नागरिक, पीएमपीएमल बसमधील प्रवासी शिवाय कांबळे व तुपे परिवाराच्या विवाह सोहळ्यातील उपस्थित मंडळी, अशा एकूण ४१४९ मतदार राजाला मतदान करण्याची शपथ देण्यात आली.
मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, अशोक कांबळे यांनी चौका चौकातील सिग्नलला थांबून शिवाय पीएमपीएमएलच्या बस थांबून ” मे पुढे, ये पुढे, मतदान कर, मतदान कर, लोकशाहीचा सन्मान कर, लोकशाहीचा सन्मान कर…..!” उठ मतदारा जागा हो, लोकशाहीचा धागा हो….!” ताई, वहिनी, काकू, मावशी, दिदी, दादा, दादी, आजी मतदानाला चला” अशा घोषणा देत ही जनजागृती करण्यात आली.
कचरा जमा करणाऱ्या घंटागाडी, छोटा हत्ती व स्वच्छ सहकारी संस्थेच्या टेंपोवर स्पीकर व माईकद्वारे अशाप्रकारचे गीत ऐकवण्यात आले. शिवाय लक्ष्मीनगर, श्रावणधारा वसाहतीत, ४० सोसायट्या मध्ये पत्रक वाटून मतदान जनजागृती केली. तसेच विशालतेने नटलेल्या भारत देशाची संसदीय लोकशाही अधिक सक्षम व बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदार राजांनी १००% मतदान करा व भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अमुल्य अशा मतदानाचा अधिकार व हक्क बजावून आपल्या पसंतीचा उमेदवार निवडा असे आवाहनही करण्यात आले.
हा अभिनव उपक्रम उपायुक्त नितीन उदास, संदीप कदम, महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे, यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे, अधिक्षक विजय इंगळे, वरिष्ठ लिपिक सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरिक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे, मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, अशोक कांबळे, सेवक परेश कुचेकर, कुणाल जाधव, अभिषेक गायकवाड यांनी मतदान जागृती अभियान राबविण्यासाठी परिश्रम घेतले.