पुणे शहर

कोथरूड-बावधन मध्ये जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त व्यापक जनजागृती अभियान…कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचा उपक्रम

कोथरूड :  “३१ मे जागतिक तंबाखू निषेध दिन” निमित्त पुणे महापालिकेच्या कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मिशन २०२६ अंतर्गत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. प्रभाग क्रमांक १०, ११ आणि ३१ मधील सर्व आरोग्य कोठ्यांच्या कार्यक्षेत्रात पानटपऱ्या व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांसमोर जाऊन नागरिकांना तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत माहिती देण्यात आली.

डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण आरोग्य कोठीच्या वतीने गेली वीस वर्षे सातत्याने जागतिक तंबाखू निषेध जनजागृती मोहीम राबविली जात असून, यंदाही हा उपक्रम उत्साहात पार पडला. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

Fb img 17803875442192531368419001118856

या मोहिमेद्वारे तंबाखू सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व आर्थिक दुष्परिणाम तसेच विविध गंभीर आजारांविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार तंबाखू सेवनामुळे दरवर्षी जगभरात लाखो लोकांचा अकाली मृत्यू होतो. तंबाखूमधील निकोटीनमुळे कर्करोग, फुफ्फुसांचे विकार, घशाचे आजार, तोंडाचा कर्करोग, हृदयविकार तसेच श्वसनसंस्थेशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतात, याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली.
भारतामध्ये दरवर्षी सुमारे दहा लाख लोकांचा मृत्यू तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होत असल्याचे सांगत, विशेषतः तरुणांनी विडी, सिगारेट, गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले. व्यसनाधीनतेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्याबरोबरच शैक्षणिक, आर्थिक नुकसान होऊन गुन्हेगारी प्रवृत्तीलाही खतपाणी मिळते, याकडेही लक्ष वेधण्यात आले.

Fb img 17722786558115856474783028037709

ही जनजागृती मोहीम डहाणूकर कॉलनी, गोपीनाथ नगर, कोथरूड गावठाण, गाढवे कॉलनी, शास्त्री नगर, मुठेश्वर कॉलनी, नवभूमी चौक, विवेकानंद कॉलनी, आझाद वाडी, गुजरात कॉलनी, मयूर कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, किष्किंधा नगर, भीमनगर, परमहंस नगर, श्रावणधारा वसाहत आणि भुसारी कॉलनी या परिसरांमध्ये राबविण्यात आली. मोहीमेदरम्यान “पान, तंबाखू, गुटखा खाऊन आपले आरोग्य धोक्यात आणू नका”, “सार्वजनिक ठिकाणी थुंकून घाण करू नका”, “विडी-सिगारेट ओढू नका, कर्करोगाला आमंत्रण देऊ नका” तसेच “तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळा, निरोगी जीवन जगा” अशा घोषणांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे, परिमंडळ कार्यालय क्रमांक ४ चे उपायुक्त अविनाश सकपाळ आणि महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वात आरोग्य निरीक्षक करण कुंभार, लक्ष्मीकांत कुलकर्णी, दत्तात्रय दळवी, किरण जाधव, गणेश साठे, जया सांगडे, प्रमोद चव्हाण, निसार शेख, गणेश चोंधे, सचिन सावंत, राजेश आहेर,मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, अशोक कांबळे, सचिन लोंढे, अक्षय अवघडे, दिनेश नागटिळक, आकाश देवकुळे, ओंकार सोनकांबळे, राहुल चव्हाण, मधुकर वाघमारे यांच्यासह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये