पुणे शहर

महाविद्यालयातील बी.ए, बी.कॉम, बी.बी.ए च्या जागा वाढवाव्यात

पुणे : बारावी परीक्षेत यंदा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण यावर्षी तुलनेने अधिक आहे. तसेच  विद्यार्थ्यांनी सुद्धा अधिक गुण प्राप्त केले आहेत. अनेक महाविद्यालयातील प्रवेशाची प्रक्रिया जवळजवळ संपली आहे. अनेक प्रसिद्ध महाविद्यालयांच्या प्रवेशयादीचा कटऑफ देखील ७० ते ८० टक्क्याच्या वरतीच आहे. यामुळेच बी.ए, बी.कॉम, बी.बी.ए, शाखेत प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांना उपलब्ध प्रवेश जागा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालयातील जागा २० टक्क्यांनी वाढवण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे करण्यात आली आहे.  

या संदर्भातील निवेदन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्याकडे दिले आहे. यावेळी प्रशांत गांधी, सुरेश(आप्पा) जैन, अभिजित महामुनी, शैलेश बडदे, प्रशांत गांधी, तौसिफ शेख, प्रकाश वाबळे. आदी सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

सद्य परिस्थितीत ३५ ते ७० टक्के गुण मिळवलेले हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिलेले आहेत. या विद्यार्थ्यांना अनेक वेगवेगळ्या महाविद्यालयात अर्ज करूनही कोठेही प्रवेश मिळालेला नाही. ६० टक्केच्या वर गुण मिळवूनही आणि पुढे शिकण्याची इच्छा असूनही, प्रवेशा अभावी भवितव्य अंधकारमय होण्याची विद्यार्थी व पालकांना भीती वाटत आहे. या परिस्थितीचा सहानुभूतीने व गांभीऱ्याने विचार करून महाविद्यालयांमध्ये बी.ए, बी.कॉम, बी.बी.ए, साठी किमान २० टक्केनी प्रवेश वाढवावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

प्रशांत गांधी म्हणाले की, कोरोनामुळे उदभवलेल्या अनेक समस्यांमुळे पालक व विद्यार्थी त्रस्त आहेत. अशातच प्रवेशाचा यक्षप्रश्न उभा राहिल्याने विद्यार्थी व पालक हवालदिल झाले आहेत. एकीकडे १२वी च्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बी.एस.सी, इंजिनीरिंग आणि फार्मसीच्या हजारो जागा रिक्त राहत आहेत. तर दुसरीकडे कला व वाणिज्याच्या विद्यार्थ्यांना अपुऱ्या असणाऱ्या बी.ए, बी.कॉम, बी.बी.ए, ला जागा नसल्यामुळे पात्रता असूनदेखील प्रवेश मिळत नाहीये. त्यामुळे जागा प्रवेश क्षमता का वाढवत नाहीत हे मात्र अनाकलनीय आहे. जागा वाढवण्यात आल्या तर हजारो विद्यार्थी व पालकांची  समस्या सुटणार आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये