गुड न्यूज! भुसावळ-नाशिक-पुणे रेल्वे पुन्हा सुरू होणार

पुणे : नाशिक-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आता सव्वादोन वर्षांनंतर हुतात्मा एक्सप्रेस धावणार आहे. सर्वाधिक प्रतिसाद असलेली हुतात्मा एक्स्प्रेस पुन्हा सुरू व्हावी, अशी प्रवाशांची मागणी होती.
कोरोना प्रादुर्भावामुळे 2020 पासून बंद करण्यात आलेली भुसावळ-नाशिक-पुणे रेल्वे सेवा 10 जुलैपासून दोन वर्षाच्या खंडानंतर सुरु होत आहे. हक्काची नाशिक-पुणे गाडी सुरु होत असल्याने प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ही गाडी सुरू होत असल्याने नाशिक, जळगाव आणि पुणे जिल्ह्यातील प्रवाशांना लाभ होणार आहे. तसेच रेल्वेस्थानकातील हमाल, रिक्षाचालक व छोटे मोठे व्यावसायिक यांनाही रोजीरोटी मिळणार आहे.
रेल्वेगाड्या पूर्वपदावर आणण्याची मागणी
रेल्वे मंत्रालयाने करोनाच्या संकटामुळे रेल्वेने खबरदारी म्हणून अनेक रेल्वेगाड्या बंद केल्या होत्या. त्यातील काही रेल्वेगाड्या हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. मात्र, त्या सर्वांना रिझर्व्हेशन सक्तीचे आहे. तिकीटही जास्त असून रिझर्व्हेशनसाठी वेळही जास्त लागत आहे. प्रवाशांच्या मागणीनंतर पंचवटीसारख्या इंटरसिटी ट्रेनला रिझर्व्हेशन एवजी जनरल करण्यात आले आहे. आणखी काही गाड्या जनरल करण्यास सुरुवात झाली आहे. इगतपुरी-भुसावळ ही पॅसेंजर गाडी मेमू ट्रेनच्या स्वरुपात काही दिवसांपूर्वी सुरु करण्यात आली आहे. पुण्याला जाताना ही गाडी पहाटे नाशिकला येते. तेथून सुमारे सहा तासांनी पुण्याला पोहोचते. ही गाडी सध्या बंद असल्यामुळे नाशिककरांना बस आणि खासगी वाहनाने पुणे गाठावे लागत आहे.
रस्त्याने वाहतूक कोंडी आणि महागडा प्रवास
रस्ते प्रवासापेक्षा नाशिक-पुणे रेल्वेगाडी स्वस्त आहे. रेल्वेपेक्षा रस्तामार्गे किमान तिप्पट भाडे लागते. शिवाय स्पेशल चारचाकी गाडी केली तर हा खर्च अनेक पटींनी वाढतो. याशिवाय खासगी वाहनाने जाताना मंचर, चाकणपासून पुणे येईपर्यंत वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे इंधनही जास्त खर्च होते. पुण्याहून रस्ता मार्गे नाशिकला येताना एक-दोन तास वाहतूक कोंडीतच जातात.
पर्यायी प्रवास त्रासदायक
काही जण पंचवटी, राज्यराणीसारख्या गाडीने कल्याणला उतरून तेथून पुण्याला जाणारी रेल्वेगाडी पकडतात. परंतु, यामध्ये खूप वेळ जातो.’एसटी’चा आधार
‘एसटी’चा आधार
डिझेलचे दर वाढल्याने ट्रेव्हल कंपन्यांनी सध्या आपल्या खासगी बससेवेचे दर कमालीचे वाढवले आहेत. त्यामुळे प्रवाशांसाठी ‘एसटी’ बसेस हा एकमेव किफायतशीर आधार सध्या उरलेला आहे. भुसावळ, नाशिकहून पुण्याला जाण्यासाठी आणि पुण्याहून नाशिक, भुसावळला येण्यासाठी प्रवाशांचे प्रथम प्राधान्य हे सध्या ‘एसटी’लाच आहे.



