कोरोना रुग्णांना सेवा देत असलेल्या डॉक्टर, नर्सेस, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा : धुमाळ

पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून आहोरात्र या रुग्णांवर डॉक्टर, नर्सेस यांच्या माध्यमातून उपचार दिले जात आहेत. इतर कर्मचाऱ्यांची त्यांना मदत मिळत आहे. परंतु डॉक्टर, नर्सेस व कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या मागण्यांकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असून त्यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
संपूर्ण जगाला कोरोना या रोगाने त्रस्त केले असून पुणे शहरात देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रुग्णांना सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, सेंटर हॉस्पिटल व आयसीयूमध्ये काम करणारे डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी यांना महापालिकेकडून वेळेवर पगार दिला जात नसल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे.
इतर मनपा सारखे त्यांना जादाची पगारवाढ, वैद्यकीय सेवा, पगारी रजा देणे, अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांना विमा संरक्षण,भत्ता आदी त्यांच्या मागण्या बाबत तातडीने विचार करावा असे धुमाळ यांनी म्हंटले आहे.
तसेच एखाद्या डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्यास त्यांना पुणे शहरातील कोणत्याही रुग्णालयात मोफत उपचार देण्यात यावेत, सदरचे डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा देतात तरी त्यांच्या मागण्यांचा त्वरित विचार करण्यात यावा, सदरच्या डॉक्टरांचे वेळेवर पगार न झाल्यास किंवा ते डॉक्टर नोकरी सोडून गेल्यास या प्रकरणाची सर्वस्व जबाबदारी महापालिकेची राहील याची दक्षता घ्यावी, इतर मनपा प्रमाणे डॉक्टरांच्या पात्रतेनुसार पगारात वाढ करून पगार वेळेवर द्यावेत अशा मागण्या धुमाळ यांनी आयुक्तांकडे केल्या आहेत.



