शिवणे खराडी रस्ता करताना जागा ताब्यात घेण्याची जी प्रकिया राबवली तीच प्रक्रिया वारजे डुक्कर खिंड ते शनी मंदिर डीपी रस्ता तयार करण्यासाठी वापरावी : दिपाली धुमाळ

पुणे : वारजे डुक्कर खिंड ते शनी मंदिर २४ मीटर डीपी रस्ता विकसित करण्या साठी जागा ताब्यात घेताना द्यावयाच्या मोबदल्याबाबत पुणे महानगरपालिकेकडून प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे मान्यतेस पाठविण्यात यावा. अशी मागणी माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
धुमाळ म्हणाल्या, पुणे महानगरपालिका हद्दीत प्रभाग क्र.32 मध्ये वारजे डुक्कर खिंड ते शनी मंदिर २४ मीटर डीपी रस्ता विकसित होत आहे. सदर रस्ता विकसित करण्यासाठी अनेक वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करीत आहोत. सदर रस्ता विकसित करण्यासाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया होणे आवश्यक आहे. रस्ता करण्याच्या अनुषंगाने ताब्यात घ्यावयाच्या जागेवर काही बीडीपीचे आरक्षण व लगतच्या बाजूने काही प्रमाणात रहिवासी झोन आहे. बहुतांशी जागेवर बीडीपीचे आरक्षण असून सदर जागा ताब्यात घेताना देण्यात येणारा मोबदला तुटपुंजा असल्याने जागा ताब्यात येत नाहीत व रस्त्याने बाधित होणारे जागेच्या जागामालकांकडून जागेवर राडारोडा टाकणे व अन्य प्रकार होत आहेत.

पुणे महानगरपालिका हद्दीत शिवणे ते खराडी रस्ता विकसित करताना जागा ताब्यात घेण्यासाठी अनेक अडचणी येऊन जागा ताब्यात येत नसल्याने पुणे महानगरपालिकेने प्रस्ताव पाठवून मागणी केल्याप्रमाणे संदर्भ क्र. १ नुसार शासन स्तरावर निर्णय होऊन पुणे महानगरपालिकेस १ चटई निर्देशांकानुसार मोबदला देणेबाबत शासनाने मान्यता दिल्याने रस्ता विकसनासाठी जागा ताब्यात येऊन रस्ता विकसित होण्याचा मार्ग सुकर झाला होता. त्याच धर्तीवर प्रभाग क्र. 32 मध्ये वारजे डुक्कर खिंड ते शनी मंदिर २४ मीटर डीपी रस्ता विकसित करणेसाठी सदर रस्त्याने बाधित जागा या बीडीपी व रहिवासी झोन मधील असल्याने जागा ताब्यात घेण्यासाठी सध्याच्या रहिवासी झोन मधील विकास हक्क हस्तांतरणीय प्रक्रियेनुसार मोबदला दिल्यास जागा ताब्यात येऊन रस्ता विकसित होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.


