ज्योतिषी, महाराज यांच्या आशीर्वादासाठी इच्छुकांच्या चकरा आणि घडलेले किस्से
राजकारण हे मुळातच अत्यंत प्रवाही आणि अनिश्चित असतं. कधी नेते, कधी परिस्थिती बदलते. कधी मांडलेला डाव भुईसपाट होतो, नव्याने डाव मांडावा लागतो. अशा या प्रवाही क्षेत्रात अनेक इच्छुक साहजिकच ज्योतिषी, महाराज यांचा मानसिक आधार शोधतात आणि त्यांच्या खूप आहारी जातात.
पाच, सहा वर्षांपूर्वी एक आमदार काळा कोट घालून वावरायचे. चर्चा अशी होती की, राजकीय भवितव्य उज्वल व्हायला हवे असेल तर, काळा कोट घालून वावरा असे ज्योतिषाने त्यांना सांगितले होते. काँग्रेसचे एक नेते पूर्वी देव-देव, अंगारे, धुपारे यासाठी प्रसिद्ध होते. पेठेत राहाणारे काँग्रेसचे एक माजी नगरसेवक दररोज उभं, तांबड गंध लावून घरातून बाहेर पडायचे. त्यांना कोणी गुरूंनी सांगितले होते की, घराबाहेर जाताना गंध लावून जात जा. एरंडवण्यातील दोन नगरसेवक निवडणूक काळात असेच धार्मिक झाले होते. एकमेकांविरुद्ध अर्ज भरण्यापूर्वी गुरूंचे दर्शन घ्यावे म्हणून ते गेले ते नेमके एकाच गुरुकडे. गुरूंच्या मठात एकमेकांची समोरासमोर गाठ पडताच ते दोघेही न बोलताच माघारी परतले. यात गुरू तरी आशीर्वाद कोणाला देणार? शिवसेनेच्या एका उमेदवाराना असेच एक गुरू भेटले होते. गुरूंचा आदरसत्कार वगैरे झाला. गुरू बराच वेळ उमेदवारांच्या ऑफिसमध्ये बसून होते. पण, शेवटपर्यंत ते त्या उमेदवाराला तुम्ही यशस्वी व्हाल असे काही म्हणेनात त्यावरुन तेथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी काय ते ओळखले.
असे अनेक मनोरंजक प्रकार घडले आहेत आणि घडतही आहेत.अलीकडे काही हॉटेल्समधून ज्योतिषांचा वावर वाढला आहे. निवडणूक आली तसे ज्योतिषांना, महाराजांनाही चांगले दिवस आले आहेत. इच्छुकांच्या चकराही चालू झाल्या आहेत. …..हे घडतच राहणार आहे.
राजेंद्र पंढरपुरे (जेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक)
One Comment