पुणे शहर

वारजे माळवाडी येथील रामनगर गृहनिर्माण संस्थेच्या २०० कोटींच्या गृहप्रकल्प घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा ..

आमदार अमित गोरखे यांची विधान परिषदेत जोरदार मागणी

मुंबई, : पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील सर्व्हे नं. ३५ व ३६ मधील भटक्या-विमुक्त समाजासाठी आरक्षित असलेल्या जमिनीवरील रामनगर गृहनिर्माण संस्थेच्या सुमारे ₹२०० कोटींच्या कथित गृहप्रकल्प घोटाळ्याचा मुद्दा आमदार अमित गोरखे यांनी आज विधान परिषदेत उपस्थित करून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करण्याची जोरदार मागणी केली.


या जमिनीचा मूळ उद्देश भटक्या-विमुक्त समाजातील वंचित कुटुंबांचे पुनर्वसन व घरकुल उभारणी हा होता. मात्र, प्रत्यक्षात या जमिनीचा लाभ नेमका कोणाला झाला, पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळाला का, की त्यांच्या हक्कांवरच कुणीतरी डल्ला मारला, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

Img 20260222 wa00063650015197115571458

आमदार अमित गोरखे यांनी सभागृहात सांगितले की, आरक्षित जमीन, लाभार्थ्यांची यादी, विकास परवानग्या, निधीचा वापर, प्रकल्पाची अंमलबजावणी आणि कथित आर्थिक गैरव्यवहार याबाबत अनेक गंभीर शंका उपस्थित होत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे अत्यंत आवश्यक आहे.

ते पुढे म्हणाले की, भटक्या-विमुक्त समाजाच्या हक्कांशी तडजोड करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालता कामा नये. शासनाची जमीन, शासनाचा निधी आणि वंचित समाजाच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. तसेच, या प्रकरणातील सर्व जबाबदार व्यक्तींना कायद्याच्या चौकटीत आणून पात्र लाभार्थ्यांना त्यांचा न्याय आणि हक्क मिळवून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. हा केवळ जमिनीचा किंवा गृहप्रकल्पाचा विषय नसून, तो वंचित समाजाच्या न्यायाचा, हक्काचा आणि शासनावरील विश्वासाचा प्रश्न आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये