पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांना महाविकास आघाडी उतरवणार?; भाजपचं टेन्शन वाढलं

पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. स्वतः रवींद्र धंगेकर यांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संधी दिल्यास लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे आता पुण्यातील राजकीय वातावरण अधिकच तापणार असल्याचं चित्रं आहे.
पुणे लोकसभा पोटनिवडणूकीच्या उमेदवारीवरून भाजपत खल सुरू झाला आहे. गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे या तीन नावांवर सध्या भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. संजय काकडे आणि मुरलीधर मोहोळ यांना राजकीय अनुभव मोठा आहे. तर स्वरदा बापट या नवख्या आहेत. त्यामुळे भाजप कुणाला तिकीट देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपने कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांना डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. त्याचा मोठा फटका भाजपला बसला. गेल्या 20-22 वर्षापासून कसब्यावर वर्चस्व असलेल्या भाजपला या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. टिळक कुटुंबीयांना डावलल्याने मतदारांनी हा रोष व्यक्त केला होता. त्याचीच पुनरावृत्ती पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत होऊ नये म्हणून भाजपने अत्यंत सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. तर काँग्रेसकडून या जागेवर धंगेकर यांना उभं करण्याची तयारी सुरू झाली आहे.
भाजपचा डाव उलथवून लावण्याची कॉंग्रेसची तयारी
राज्यात कॉंग्रेसचे धंगेकर यांची जायंट किलर अशी ओळख झाली आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊन भाजपचा डाव उलथवून लावण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झाल्यास सहा महिन्याच्या आत त्या मतदारसंघात पोटनिवडणुका घेतात. त्यानुसार पुणे लोकसभेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. पुणे लोकसभेची जागा रिक्त झाल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग लवकरच या निवडणुकीची घोषणा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. साधारणपणे ऑगस्टपर्यंत ही निवडणूक होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.



