वारजेत लहान मुलेच आली स्वच्छ्ता दुत बनून ; आपल्या कृतीतून दिला बेजबाबदार नागरिकांना योग्य सल्ला..

वारजे : वारजे माळवाडी मधील अरविंद स्मृती येथील डीपी जवळ गेले अनेक दिवस काही बेजबाबदार नागरिकांकडून कचरा टाकला जात होता. या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याचा धोका वाढला होता. हा धोका लक्षात घेत परिसरातील लहान मुले एकत्र आली व त्यांनी पालिकेला जे जमले नाही ते करून दाखवले. येथील कचरा साफ करून या मुलांनी येथील कचरा पडण्याचा स्पॉट बंद करण्यासाठी घेतलेल्या पुढाकार घेतला. मुलांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जागतिक आरोग्यदिनी मुलांनी राबवलेला हा स्तुत्य उपक्रम वारजे माळवाडी परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. या मुलांनी आपल्या कृतीतून बेजबाबदार नागरिकांना योग्य तो संदेश देण्याबरोबरच पालिकेच्या आरोग्य विभागाच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांना आम्ही करून दाखवलं हेच दाखवून दिलं आहे.
स्वाती अनिल पाटणकर, केतन गोविंद उगले, केतकी गोविंद उगले, तेजस तानाजी मालुसरे, ओंकार पवार, राजवीर पवार या शालेय विद्यार्थ्यांनी मळवडीतील अरविंद स्मृती येथील डीपी जवळील रस्त्याकडेची कचरा पडत असलेली जागा स्वतः स्वच्छ करुन, त्या ठिकाणी डिपीवर देवतांचे फोटो लावले. आणि झाडांच्या कुंड्या लावून परिसर साफसुथरा केला. या सर्व विद्यार्थ्यांचे माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी कौतूक करून त्या सर्वांना छोटीशी भेट दिली आहे.







