शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी महापालिका सभागृहात मांडली आपली स्पष्ट भूमिका..

पुणे महानगरपालिका सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झाली चर्चा
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी शहराच्या विकासाशी निगडित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठाम आणि मुद्देसूद भूमिका मांडली.
यावेळी बोलताना हर्षवर्धन मानकर यांनी शिवसृष्टी प्रकल्पाचा मुद्दा विशेषत्वाने उपस्थित केला. ते म्हणाले, “माझे वडील, माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी कोथरूडमधील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याची संकल्पना मांडली होती. पुणे महानगरपालिकेत यावर ठराव करण्यात आला असून तेव्हापासून दरवर्षी अंदाजपत्रकात निधीची तरतूद केली जाते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बी.डी.पी. झोनमध्ये शिवसृष्टी उभारण्याचे आश्वासन दिले होते; मात्र शासन स्तरावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. पुणे शहरात मोठे प्रकल्प राबवले जात असताना शिवसृष्टी प्रकल्पासाठीही आग्रही भूमिका घेऊन तातडीने कार्यवाही करण्यात यावी.”आहे ते म्हणाले.

पुणे शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करता नियोजन वास्तववादी आणि परिणामकारक असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अंदाजपत्रकातील सकारात्मक बाबींचे स्वागत करतानाच अंमलबजावणीबाबत स्पष्टता आणि जबाबदारीची मागणी त्यांनी केली. पायाभूत सुविधांबाबत बोलताना शहरातील वाहतूक कोंडी, अपूर्ण रस्ते आणि खड्ड्यांच्या समस्यांवरही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. पाणीपुरवठा विषयावर समान पाणीपुरवठा योजनेची प्रभावी अंमलबजावणी, पाणी गळती रोखणे आणि टंचाईग्रस्त भागांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मानकर यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत बायोगॅस आणि झिरो स्लजसारख्या योजनांचे स्वागत करतानाच प्रत्यक्षात मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे समस्या गंभीर असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.आरोग्य क्षेत्रात मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांच्या घोषणांचे स्वागत करताना त्यांनी मनपाच्या अनेक रुग्णालयांमध्ये केवळ ओपीडीपुरत्याच सेवा उपलब्ध असल्याची बाब मांडली आणि सर्व सुविधा कार्यान्वित करण्याची मागणी केली. त्यांच्या प्रभागातील दवाखान्यातही विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



महिला सक्षमीकरणासाठी जाहीर केलेल्या योजनांचे स्वागत करताना जुन्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था दूर करण्यावरही त्यांनी भर दिला. शिक्षण क्षेत्रातील उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले. पर्यावरणाच्या दृष्टीने १० लाख झाडे लावण्याच्या संकल्पाचे स्वागत करत त्यांनी ती झाडे जगविण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली. तसेच आदरणीय अजितदादा पवार यांचे नाव शहरी गरीब योजनेला दिले त्याबद्दल दादांचा कार्यकर्ता म्हणून आभार व्यक्त केले.
बी.डी.पी. झोनमधील जागांचा वापर करून सीएसआरच्या माध्यमातून वृक्षारोपण केल्यास अनधिकृत बांधकामांवरही आळा बसेल, असे त्यांनी सुचवले. आर्थिक बाबींवर बोलताना मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत, सामान्य नागरिकांप्रमाणेच मोठ्या व्यावसायिकांवरही कठोर कारवाई करून थकबाकी वसूल करावी, अशी मागणी त्यांनी केली. चर्चेच्या शेवटी त्यांनी स्पष्ट केले की, “अंदाजपत्रक कागदावर आकर्षक असले तरी त्याची खरी कसोटी अंमलबजावणीत आहे. पुणेकरांना केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष परिणाम हवेत.” प्रत्येक प्रकल्पासाठी स्पष्ट वेळापत्रक, जबाबदारी आणि पारदर्शकता आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पुणे शहराचा विकास सर्वसमावेशक आणि सर्व घटकांपर्यंत पोहोचणारा असावा, हीच अपेक्षा मानकर यांनी व्यक्त केली.



