फुले दाम्पत्याचा अवमान केल्याबद्दल मालेगावच्या युवकाविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

पुणे – मालेगावमधील एका युवकाने महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या अदिती बाबर यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अदिती बाबर म्हणाल्या की, ज्या सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी अतोनात त्रास सहन केला, अपमान आणि यातना भोगल्या, त्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज मी माझे शिक्षण पूर्ण करू शकले. देशातील प्रत्येक स्त्री सावित्रीबाई यांच्या कार्यामुळे शिकू शकली. त्यामुळे मी आणि माझ्यासारख्या हजारो ‘सावित्रीच्या लेकी’ हा अवमान कदापि सहन करणार नाही.
सदर आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे, ही माझी ठाम मागणी आहे.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे महेश पाटील व सर्व बहुजन, महिला मंडळ त्याच प्रमाणे मंदार खरात,भीमराव चव्हाण, रमेश भालेराव, किशोर तडके, अजय भोसले, ओंकार लोंढे, तेजस वैष्णव सुनीता चव्हाण,संध्या शिंदे सचिन शिंदे व स्वराज मित्र मंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कृती समिती साम्राज्य प्रतिष्ठान चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.



