महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन..परत या परत या अजित दादा परत या घोषणांनी वातावरण भावूक

साश्रू नयनांनी लाडक्या दादाला अखेरचा निरोप

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. परत या परत या अजित दादा परत या, अजित दादा अमर रहे, कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला अशा कार्यकर्त्यांकडून देण्यात येणाऱ्या घोषणांनी वातावरण भावूक झाले होते. पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी जड अंतःकरणाने दादांचे दर्शन घेतले. पार्थ पवार आणि जय पवार या दादांच्या मुलांनी त्यांना मुखाग्नी दिला आणि त्यानंतर साश्रू नयनांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आपल्या दादाला अखेरचा निरोप दिला.

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह नितीन गडकरी, पंकजा मुंडे, रामदास आठवले, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, छगन भुजबळ, मुरलीधर मोहोळ, चंद्रशेखर बावनकुळे, शाहू महाराज छत्रपती हसन मुश्रीफ, नीलम गोऱ्हे, अदिती तटकरे, धनंजय मुंडे, महादेव जानकर, मेधा कुलकर्णी, आणि अभिनेते रितेश देशमुख यांनी अजित पवारांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. त्यासोबतच पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

काल २८ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात बारामती येथे मृत्यू झाला आणि अख्खा महाराष्ट्र स्तब्ध झाला..त्यांच्या जाण्याने देशभरात शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या जाण्याची बातमी कळताच पाणावलेल्या डोळ्यांनी कार्यकर्त्यांनी, चाहत्यांनी बारामतीच्या दिशेने धाव घेतली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील बारामतीत दाखल झाले. काल सायंकाळी अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यदर्शनासाठी  ठेवण्यात आले होते. आपल्या लाडक्या दादाच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसागर उसळला होता. सर्व जण या गोष्टीवर विश्वासाच बसत नाही असे बोलत होते. सर्व पवार कुटुंबीय यावेळी उपस्थित होते..कार्यकर्त्यांना आवरण अवघड होऊन बसले होते. महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या या घटनेने सर्वांची मने हेलावून गेली होती. एका विकासाची दूरदृष्टी ठेवून कामाने कायम झपाटलेल्या नेत्याला गमावल्याची खंत सर्वच जण व्यक्त करताना दिसत होते.

आज सकाळी पवारांच्या मुळ गावी काटेवाडी येथे अजित पवार यांचे पार्थिव नेण्यात आले. तेथे गावकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात अंत्यदर्शनासाठी गर्दी करण्यात आली होती. अजित दादांना तिरंग्यात लपेटलेले पाहून गावकऱ्यांचा अश्रूंचा बांध फुटला. काल ही घटना घडल्यानंतर काटेवाडी पूर्ण गाव शोकाकूल झाले होते. कोणत्याही घरात चूल पेटली नव्हती. आज गावकऱ्यांनी दादांचा अखेरचा निरोप घेतल्यानंतर फुलांनी सजवलेल्या रथामधून दादांचा पार्थिव काटेवाडीतून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणण्यात आले. लोक या रथामागे धावत पळत होते. रस्त्याच्या कडेला थांबून दर्शन घेत रडत होते.

तब्बल तीन ते चार दशके महाराष्ट्राच्या राजकारणावर दबदबा निर्माण करणाऱ्या अजित पवार यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. दादा अनंतात विलीन होताना कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांच्याच अश्रूंचा बांध फुटला.  दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला संपूर्ण जमावच हेलावून गेला होता.

आज पहाटेपासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो कार्यकर्त्यांनी बारामतीत गर्दी केली होती. “अजितदादा अमर रहे”, “कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

Img 20260128 wa01627128372178461314041

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये