रणझुंजार थोर क्रांतिकारक आणि श्रेष्ठ कृषितज्ञ डॉ.पांडुरंग सदाशिव खानखोजे

पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८४ रोजी वर्धा येथे झाला. वडील सदाशिव खानखोजे हे अर्जनवीस होते. पांडुरंगचे आजोबा तात्याजी खानखोजे १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील अज्ञात सैनिक होते .तो वसा आणि वारसा पांडुरंगाला लाभला .परकीय राज्यसत्तेविरुद्ध लढा देण्याचा , सशस्त्र शिस्तबद्ध आणि स्वातंत्र्या साठी प्राणार्पण करणार्यांची फौज करण्याचा मानस दृढ होत गेला .पांडुरंगचे सुरूवातीचे शिक्षण वर्ध्याच्या इंग्लिश मिडल स्कूल मधे झाले. महादेव गोविंद रानडे आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या अत्यंत प्रभावशाली व्याखानांचा प्रभाव पांडुरंगवर पडला.१८९६मधे शाळकरी विद्यार्थी असतांना बाल समाज नावाची एक गुप्त संस्था स्थापन करून बाल मित्र भारताचा खरा इतिहास जाणून घेत…
१९०१ मधे प्राथमिक शिक्षण आटोपून पांडुरंग नागपूरला नील सिटी हायस्कूल ला दाखल झाला .लोकमान्य टिळकांचे ब्रिटिश सरकारवर टीका करणार्या लेखांमुळे टिळकांविषयी आदर होताच.१९०५ मधे पुण्याला टिळकांची भेट घेतली .जपान हे लष्करी प्रशिक्षणासाठी सर्वोत्तम ठिकाण असू शकते .लष्करी प्रशिक्षणासाठी परदेशी जावे हा गुरुमंत्र घेऊन १९०६ साली जपान चा मार्ग स्वीकारला अपार कष्ट ,हालअपेष्टा आणि काबाडकष्ट सहन करत सैनिकी शिक्षण घेतले.पांडुरंग यानंतर चार दशकाहून अधिक काळापर्यंत भारतात परतले नाहीत .अगदी तरुण वयातच स्वातंत्र्य प्राप्तीच्या ध्यासाने पांडुरंग खानखोजे यांना कित्येक अग्निदिव्यांना तोंड द्यावे लागले.
१९०८ पासून स्वातंत्र्य चळवळीत देशाबाहेरील काम करणार्या कार्यकर्त्यांशी संबंध आला अमेरिकेत गदर स्थापण्यात त्यांची अग्रणी भूमिका होती .गदर आंदोलनाचा भौगोलिक विस्तार खूप मोठा होता .गनिमी युद्ध नीती आणि विकेंद्रीत सैन्य रचना गदर ने स्वीकारली होती .वायव्यसरहद्द प्रांत आणि पुरवांचल ही गदर सेनेची आक्रमणाची लक्ष्य केंद्रे होती .देशासाठी सशस्त्र क्रांति इतकेच संशोधन आणि कृषि शिक्षण ,कृषि क्रांती देखील महत्वाचे आहे .पांडुरंग ने कृषि क्षेत्रातील आपले शिक्षण पूर्ण केले .कृषि शास्त्रातील सर्वोच्च पीएचडी संपादन केली. .मेक्सिको कृषिमंत्री रोमोन देनेग्री यांचे मदतीने राष्ट्रीय कृषि विद्यापीठात मक्याच्या अनेक उन्नत जाती आणि इतरही पिकांवर संशोधन करून मेक्सिकोत कृषिक्रांती घडवून आणली. गरिबांचा अन्नदाता ही ओळख आणि गौरव प्राप्त केला .मका ,गहू रबर ,शेवगा ,सोयाबीन यावरील विविध संशोधनातून आणि योगदांनातून मेक्सिकोच्या कृषिक्रांतीचे चे जनकत्व मिळविले .
१९४९ मध्ये मध्यप्रदेशातील तत्कालीन कृषिमंत्री रा कृ पाटील शेती सुधार समितीची स्थापना करून डॉक्टर खानखोजे यांना अध्यक्ष केले॰भारत सरकार ने फूड कमिशनर म्हणून नेमणूक केली होती .१९५१ मधे त्यांनी मुक्तग्राम चळवळीचा आराखडा कृषिशिक्षण ,दुर्जल शेतीची संकल्पना सामूहिक शेती ,मूल्यवर्धन साखळीची निर्मिती तसेच भारताच्या सीमेवरील सैनिकांच्या वसाहती व शेती अश्या अनेक शिफारसी केल्यात .नागाच्या सल्लागारपदी नेमूणूक झाल्यावर १९५६ ते १९६४ पर्यन्त शेतीविषयक अनेक व्याख्याने दिलीत ,ग्रामहीत मासिकातून शेतीविषयक अनेक लेख दिलेत.कृषि आणि हरित क्रांतीसाठी सातत्याने शेवटपर्यंत प्रयत्नशील होते. अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही याची खंत मात्र डॉक्टर खानखोजे यांना कायम राहिली. असा हा रणझुंजार क्रांतिकारक आणि थोर कृषि शास्त्रज्ञ १८ जानेवारी १९६७ रोजी भारतभूमीच्या कुशीत विसावला .
डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांना विनम्र अभिवादन !
संकलन : दिलीप खानखोजे कोथरूड पुणे




