कोथरूड मध्ये होणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’च्या लोगोचे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण !

पुणे : कोथरूड मध्ये १० ते १४ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या लोगोचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर विरोधी पक्षनेते अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून स्पर्धेची तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा लोगो अनावरण कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, भाजपा शहराध्यक्ष जगदीळ मुळीक, चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, अहमदनगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते पै. विलास कथुरे, पै. मेघराज कटके, पै. नवनाथ घुले, पै. गणेश दांगट, पै. माऊली मांगडे, पै. कृष्णा बुचडे, पै. संतोष माचुत्रे आदी उपस्थित होते.
स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘महाराष्ट्र केसरी’चे आयोजन यंदा मोहोळ कुटुंबीयांकडे आहे. स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, कोथरूड येथे स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून, आज स्पर्धेचा लोगो अनावरण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाला, याचा निश्चितच आनंद आहे. अशा भावना मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या.




