पुलगेट येथे मोफत नेत्र तपासणी

पुणे – पुणे ख्रिस्ती धर्मप्रांतात ख्रिस्ती धर्मात अग्रेसर असलेल्या कॅथोलीक असोसिएशन ऑफ पुणे, या धार्मिक व सामजिक संस्थेने पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशनच्या, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या संयुक्त विदयमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले होते.
ख्रिस्ती लोकांच्या उपवास काळानिमित्त सेंट ॲन चर्च, कॅंम्प पुलगेट येथे संस्थेचे अध्यक्ष व फादर जॉर्ज यांच्या प्रार्थना व आशीर्वादाने नेत्र तपासणी शिबिराची सुरुवात करण्यात आली. वानवडी, कॅम्प, सोलापूर बाजार, वडगांव शेरी व अन्य भागातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात पाच तज्ञ डॉक्टर सर्व उपकरणासह हजर होते. गरजुंना हॉस्पिटलतर्फे अत्यल्प दरात चष्मे उपलब्ध करुन देण्यात आले.
ज्यो कसबे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना “सामाजिक कामात ख्रिस्ती समाज हा नेहमीच अग्रेसर असतो. प्रार्थनेबरोबरच रुग्णसेवा, शिक्षण व त्याद्वारे रोजगार निर्मिती अशा अनेक सामाजिक चळवळीत ख्रिस्ती समाज काम करत असल्याचे सांगितले. कॅथोलीक असोसिएशन ऑफ पुणे व सर्व ख्रिस्ती संघटनांनी एकत्र येऊन काम केले तर नक्कीच भविष्यात मोठया प्रमाणात सामाजिक कामे होऊ शकतात. त्याचा फायदा समाजातील उपेक्षित व गरजू लोकांना होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
संस्थेचे पाॅल टेलीस, मारिया उलाल, जॅकलीन फाॅरेस्टर, झेवियर डिसिल्वा, मिना नेल्सन, संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख जयप्रकाश पारखे तसेच सेंट ॲन चर्च च्या क्रियाशील सदस्य ज्युलियाना मॅडम, सचिव हिवाळे सर व इतर सर्व सभासदांनी सहभाग घेतला . संस्थेचे अध्यात्मिक सल्लागार फा. जॉर्ज यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले. तसेच पुणे धर्म प्रांताचे प्रशासकीय प्रमुख फादर रॉक अल्फोन्सो, सेंट अँथनी शाळेचे प्राचार्य फादर जेम्स लूक यांचे सहकार्य मिळाले. तसेच पुणे धर्म प्रांताचे आर्चबिशप सन्माननीय जॉन रॉड्रिक्स यांचे विशेष आशीर्वाद लाभले.
संस्थेच्या महिला प्रमुख जॅकलीन फाॅरेस्टर, आर्चबिशप तसेच सर्व चर्चचे प्रमुख धर्मगुरू, हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर,जितेश खरात सर व डॉ. दिव्या चव्हाण यांच्या सहकार्याने शिबीर यशस्वी झाले.