कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकातील उड्डाणपुलावर भीषण अपघात; दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

कर्वे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी
पुणे : कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकात उभारण्यात आलेल्या नवीन उड्डाण पुलावर भीषण अपघात झाला असून या अपघातात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची माहिती मिळत आहे.
डेक्कन पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात संगमेश्वर सिद्धाराम साखरे (वय 28, मुळ राहणार सोलापूर)या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. संगमेश्वर हा एम एच 12 क्यू झेड 1738 या ॲक्टिवा दुचाकीवरून कोथरुडकडून डेक्कन जात होता. नळस्टॉप चौकातील उड्डाणपुलावर त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा गंभीर अपघात घडला असल्याचे प्रथमदर्शिंकडून सांगण्यात येत आहे.

या अपघातामुळे उड्डाणपुलावरील कोथरुडकडून डेक्कनकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. वाहतूक खालील बाजूने वळवण्यात आल्याने उड्डाणपुलाच्या खाली असणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला असून दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.






