महाराष्ट्र

शिवसेना ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास हायकोर्टाकडून परवानगी

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचंही महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे.

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाच्या याचिकेविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. यावेळी पालिकेचा निर्णय नाकारण्याचा निर्णय वास्तविकतेला धरून नाही, असं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं. दादर पोलिसांचं संख्याबळ पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असल्याचंही न्यायालयाने नमूद केलं.

मेळाव्यादरम्यान काही गोंधळ झाल्यास या मुद्द्यावर भविष्यात परवानगी न देण्याबाबत उच्च न्यायालयाने सूचक इशाराही दिला आहे. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांना मेळाव्याचे चित्रीकरण करण्याचीही मुभा देण्यात आली.

Img 20220910 wa0003

ठाकरे गटाचा युक्तिवाद

५ ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्याची सुनावणी करताना न्यायालयाने सर्वात आधी शिवाजी पार्क मैदानासाठी कोणी अर्ज केला असा प्रश्न विचारला. यावर ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील अस्पी चिनॉय म्हणाले, “ठाकरे गटाने २२ आणि २६ ऑगस्टला अर्ज केला होता. शिंदे गटाच्या सदा सरवणकरांनी ३० ऑगस्टला अर्ज केला होता. सरवणकरांनी अर्ज केला केवळ हेच कारण मनपा सांगत आहे. जर त्यांची कायदा सुव्यवस्था खराब असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. रेकॉर्ड पाहिले तर आम्हाला शिवाजी पार्कवर सभेसाठी परवानगी मिळायला हवी.”

पोलीस एका आमदाराला नियंत्रणात ठेऊ शकत नाही का?

“गटबाजीतून पोलिसांनी संबंधित अहवाल दिला आहे. पोलीस परिस्थितीवर बोलत नाही. ते एका आमदाराला नियंत्रणात ठेऊ शकत नाही का? आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार करत नाहीये,” असा युक्तिवाद केला. यावर न्यायालयाने तुमच्याविरोधात इतर काही तक्रारी आहेत का विचारलं. त्यावर चिनॉय यांनी माझ्या माहितीप्रमाणे नाही असं उत्तर दिलं. तसेच एका आमदाराने तक्रार केली म्हणून इतक्या वर्षांची परंपरा रोखली जाऊ शकत नाही, असंही म्हटलं.

चिनॉय पुढे म्हणाले, “सदा सरवणकरांच्या याचिकेतील पहिल्या पानावरील आणि शेवटच्या पानावरील माहिती वेगळी आहे. त्यांनी जे म्हटलंय ते केवळ अडथळा निर्माण करण्यासाठी आहे. खरी शिवसेना कोणाची हा या याचिकेचा विषय नाही. मग याचिकेत त्यांनी हा विषय कसा उपस्थित केला? आयुक्तांनीही शिवसेनेने परवानगी मागितली आहे हे स्वीकारलं आहे. या हस्तक्षेप याचिकेचा हेतू केवळ राजकीय कुरघोडी करण्याचा आहे. हे होऊ देऊ नये.”

महापालिका वकिलांचा युक्तिवाद

ज्येष्ठ वकील मिलिंद साठे म्हणाले, “याचिकाकर्त्यांचा कोणत्या अधिकाराचं उल्लंघन झालंय? शिवाजी पार्क हे खेळाचं मैदान आहे आणि ते ‘सायलेंट झोन’मध्ये आहे. त्या मैदानाची मालकी बीएमसीकडे आहे. त्यांच्याकडे अर्ज करण्यात आला आहे. २०१० मध्ये उच्च न्यायालयाने त्या परिसराला सायलंट झोन म्हणून घोषित केलं आहे आणि तसेच खेळाशिवाय मैदानाच्या वापरावर निर्बंध घातले आहेत.”

“ते मनपाच्या निर्णयाला विकृत कसं म्हणू शकतात. आम्ही कुणालाही परवानगी दिलेली नाही. सर्वांना केवळ शांततापूर्ण मार्गाने एकत्रित येण्याचा अधिकार आहे. विशिष्ट मैदानावर रॅली घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे ते एका विशिष्ट मैदानाचा आग्रह करू शकत नाही. त्यांच्या बोलण्याच्या अधिकारावर कुणीही रोख लावली नाही किंवा त्यांना एकत्रित येण्याचा अधिकारही नाकारलेला नाही,” असा युक्तिवाद साठे यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये