वनाझ परिवार सोसायटीमध्ये आग तांडव; अग्नीशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणत नागरिकांची केली सुटका

पुणे : पौड रस्त्यावरील वनाझ कंपनीच्या मागे असलेल्या वनाझ परिवार सहकारी गृहरचना संस्थेच्या डी इमारतीच्या एम एस ई बी मीटर रूमला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यामुळे इमारतीच्या सर्व परिसरामध्ये धुराचे लोळ पसरल्यामुळे काही सदनीकांमध्ये नागरिक अडकून पडले होते. इमारतीच्या सहाव्या सातव्या आठव्या आणि नवव्या मजल्यावरील सर्व सदनिका धारक घरामध्ये असल्यामुळे ते धुराच्या लोळामुळे घरातून बाहेर पडू शकत नव्हते.
संजय काळे यांना ही घटना समजताच त्यांनी तात्काळ अग्निशामक दलाला कळवून घटनेची माहिती दिली. एम एस ई बी चे अभियंता काळे यांना देखील कळवून लाईटचा सप्लाय बंद करायला सांगितला. अग्निशामक दलाकडून तात्काळ आग विझवून सदनिकांमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली.
वनाझ शिवशंभो सेवा प्रतिष्ठान ट्रस्टचे कार्यकर्ते संजय काळे, दीपक कूल, भाऊसाहेब सातपुते,विशाल उभे,महेश कांबळे अभिजीत यादव महेश यादव संजय खाडे विकास जाधव मिलिंद देशपांडे यांनी अग्निशामक दल येण्यापूर्वी आग विझवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर अग्निशामक दलाला देखील आग विझवण्यासाठी मदत केली. घटनेचे गांभीर्य पाहता परिसरातील संगम तरुण मंडळाचे व शिवशाही प्रतिष्ठानचे कार्यकर्ते स्थानिकांच्या मदतीला धावून आले यामध्ये प्रामुख्याने राज जाधव अनिकेत मांडके रोहन गाढवे प्रफुल्ल कुडले सचिन मोरे यांनी आग विझवण्यासाठी व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मदत केली.










