बनावट एसएमएसद्वारे वीज ग्राहकांची फसवणूक

शासनाने कडक कारवाई करावी आमदार शिरोळे यांची मागणी
पुणे – अलिकडे बनावट एसएमएस करुन वीज ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याची गंभीर दखल घेऊन पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली आहे.
पुणे जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीची बैठक पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पुण्यात झाली. या बैठकीत बोलताना आमदार शिरोळे यांनी सांगितले, वीज ग्राहकांना बनावट एसएमएस पाठवून त्यांच्या वैयक्तिक मोबाईल नंबरवरुन संपर्क साधण्यास सांगितले जाते. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगून वीज ग्राहकांची आर्थिक फसवणूक केली जाते. हे प्रकार पुण्यात पुन्हा वाढले आहेत. त्याची गंभीर दखल घेऊन अशा गुन्हेगारांवर पोलीस खात्याने कडक कारवाई करावी.

सध्या वीज बिल न भरलेल्या ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची वीज खंडित केली जाते. यात कारवाई करण्यापूर्वी नागरिकांना त्याबाबत कल्पना देणे आवश्यक आहे, अशी सूचना आमदार शिरोळे यांनी बैठकीत केली. सर्व वस्ती भागात भूमीगत केबल टाकण्यात याव्यात. तसेच शहरातील भूमीगत केबल टाकण्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, असेही आमदार शिरोळे यांनी बैठकीत सुचवले.
शिवाजीनगर मतदारसंघातील घोले रोड, गोखले नगर, औंध गावठाण या भागांमधून वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी तेथील नागरिकांकडून येत असतात. याची दखल घेऊन वीज पुरवठ्यात सुधारणा केली जावी. मतदारसंघात अनेक डीपी नादुरुस्त आहेत. त्यांची पाहाणी करुन दुरुस्ती करण्यात यावी. अथवा ते डीपी बदलून टाकावेत, अशी सूचना आमदार शिरोळे यांनी केली.



