जनसंवाद कट्ट्यांचा निधी महापालिकेचा की वैयक्तिक नगरसेवकांचा… नाम फलकांमुळे संभ्रम

पुणे : pune city, pmc कोथरूड विधानसभेत प्रभाग क्रमांक १२,१३,३१ या प्रभागात अनेक ठिकाणी पुणे मनपाच्या निधीतून फुटपाथवर, रस्त्याच्या कडेने वाचनालय, ज्येष्ठ, नागरिक कट्टा, जनसंवाद कट्टा, असे अनेक कट्टे उभारण्यात आले आहेत. मात्र हे कट्टे उभारताना त्यावर महापालिकेचे बोधचिन्ह न वापरता संबधित नगरसेवकाच्या निधीतून असा उल्लेख करण्यात आला असून नगरसेवकांचे व त्यांच्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे फोटो वापरण्यात आले आहेत. त्यामुळे हे कट्टे महापालिकेच्या नाही तर नगरसेवकांच्या वैयक्तिक खर्चातून उभे केले आहेत का असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.
याबाबत पुणे शहर राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे उपाध्यक्ष केदार मारणे यांनी पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन दिले असून संबंधित ठेकेदार व माननीय यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी.अशी मागणी केली आहे.
कोथरुड मधील डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर होम कॉलनी श्रमिक वसाहत , डी.पी रोड, शैलेश सभागृह शेजारी, एरंडवणे गावठाण, म्हात्रे पुला शेजारी, अशा विविध ठिकाणी पुणे मनपाच्या निधीतून हे कट्टे उभारण्यात आले आहेत. परंतु ह्या कट्ट्याच्या शेडवर पुणे महानगरपालिका यांचा कुठलाही लोगो नाही तसेच पुणे महानगरपालिकेचे नावही नाही त्यामुळे हे नगरसेवक , महापौर नक्की महाराष्ट्रातील 27 महानगरपालिका पैकी कोणत्या महानगरपालिकेचे आहेत ? असा प्रश्न पडत असल्याचे केदार मारणे यांनी म्हंटले आहे. या प्रकाराला महापालिका आधिकरीही तितकेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

वास्तविक पाहता या कट्ट्यांवर महापालिकेचे नाव व बोध चिन्ह वापरणे आवश्यक होते पण तसे करण्यात आले नसल्याने संबधित ठेकेदारावर कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांच्या कररुपी पैशातून उभारलेल्या या अशा कामांवरती महापालिकेचे नाव वापरण्यास नगरसेवकांनीच ठेकेदारांना मनाई केली आहे का याचीही चौकशी केली जावी अशी मागणी मारणे यांनी केली आहे. संबंधित फोटो देऊन केली आहे. आता यावर महापालिका काय कार्यवाही करणार हे पहावे लागणार आहे.



