ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर; शिवनेरी, अश्वमेधमधूनही करता येणार मोफत प्रवास

मुंबई : शिवनेरी आणि अश्वमेध या बसगाड्यांतूनही आता ७५ वर्षांवरील नागरिकांना आता मोफत प्रवास करणे शक्य होणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेत एसटीच्या या बससेवांचा समावेश करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यापूर्वी शिवनेरी आणि अश्वमेध या आलिशान बसगाड्यांमधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट भाडे भरून प्रवास करावा लागत होता.

एसटी महामंडळात साध्या, निमआराम, शयनयान, मिडी, आसन-शयनयान आणि वातानुकूलित या प्रकारातील गाड्या आहेत. वातानुकूलित प्रकारातील केवळ शिवशाहीमधूनच ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येत होता.
वाहतूक विभागाने एसटीच्या शिवनेरी आणि अश्वमेध या गाड्यांसाठीदेखील अमृत योजना लागू करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. ६५ वर्षांवरील ज्येष्ठांची सवलत या गाड्यांमध्ये लागू करण्याबाबत सूचना केल्या आहेत. याला एसटी महामंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत आणि ६५ वर्षांवरील नागरिकांना सवलतीच्या दरात शिवनेरी आणि अश्वमेधमधून प्रवास करण्याचा मार्ग खुला झाला आहे, असे एसटी अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचा शुभारंभ २६ ऑगस्ट रोजी झाला. नोव्हेंबरअखेर या योजनेतंर्गत दोन कोटींहून अधिक ज्येष्ठांनी मोफत प्रवास केला आहे.



असा मिळतो योजनेचा लाभ
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीने मोफत प्रवास करण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र वाहन परवाना अथवा कोणतेही शासनाने प्रामाणिक केलेले ओळखपत्र सोबत असेल तर राज्यभरात मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेला ज्येष्ठांचा कमालीचा प्रतिसाद मिळाल्याने पुढील कालावधीत ज्येष्ठांच्या प्रवासाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.


