अति तिथे माती : मोमोज चॅलेंज युवकाच्या जीवावर बेतले

गोपालगंज : वेगवेगळ्या कारणासाठी तरुण पैज लावत असल्याचे आपण नेहमीच बघतो. अशीच एक पैज युवकाच्या जीवावर बेतल्याची घटना बिहारमधील गोपालगंज येथे घडली आहे. विपीन कुमार या युवकाचा या घटनेत मृत्यू झाला.
मोबाईलचं दुकान चालवणारा सिहोरवा गावचा रहिवासी २५ वर्षांचा तरुण त्याच्या मित्रांसोबत मोमोज खाण्यासाठी गेला होता. मोमोज खाण्याचं चॅलेंज स्वीकारत त्यानं १५० मोमोज खाल्ले. त्यानंतर त्याचे सर्व मित्र निघून गेले आणि तोदेखील स्वत:च्या दुकानावर परतला. मात्र काही वेळानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. तो बेशुद्ध पडला. यानंतर कुटुंबियांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेलं. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

विपीनचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला. विपीनचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनानंतर कुटुंबियांच्या ताब्यात दिला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूमागचं नेमकं कारण स्पष्ट होईल.
मोमोज खाऊन आमच्या लेकाचा जीव जाऊ शकत नाही. विष देऊन त्याची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप त्याच्या वडिलांनी केला. या प्रकरणी पोलीस शववविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. अहवाल आल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं.












