पुण्यातून रेल्वेने प्रवास करताय तर नियोजित वेळेपूर्वी एक तास आधी स्टेशनवर पोहचा..

पुणे : तुम्ही पुण्यातून रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता प्रवाशांना विमानातळाप्रमाणेच रेल्वे स्टेशनवरही एक तास आधी पोहोचावं लागणार आहे. नियोजित ट्रेन सुटण्याच्या आधी एक तास प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवर पोहोचावं, असा सल्ला रेल्वे व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे. पुण्याहून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये चेन ओढण्याचं प्रमाण वाढल्यामुळे ही बाब सांगण्यात आल्याचं कळतं.
पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडी प्रचंड वाढली आहे. या कोंडीमुळे प्रवासी रेल्वेच्या वेळेत पोहोचत नाहीत. परिणामी काही प्रवाशांचे नातेवाईक जाणूनबुजून ट्रेन सुरु झाली की चेन ओढतात. रेल्वेच्या चेन खेचण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. या गोष्टीचं गांभीर्य ओळखून हे प्रकार कमी करण्यासाठी रेल्वे व्यवस्थापनाकडून प्रवाशांना नियोजित ट्रेनच्या एक तास आधी स्टेशनवर येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पुणे शहरातील वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या बनली आहे ज्यामुळे रेल्वेच्या कामकाजावर, विशेषतः संध्याकाळच्या वेळी परिणाम झाला आहे. नातेवाईक आणि मित्र ट्रॅफिकमध्ये अडकल्याने आणि वेळेत स्थानकावर पोहोचू न शकल्याने प्रवासी चेन खेचतात. त्यामुळे प्रवाशांना आमचं आवाहन आहे की, पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचण्यासाठी त्यांच्या संबंधित स्थानावरुन वेळ आणि अंतराचं कॅल्क्युलेशन करावं आणि ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या किमान एक तास आधी पोहोचावं, असं पुणे रेल्वे विभागाचे प्रवक्ते मनोज झंवर यांनी म्हटलं.



