शिवजयंतीनिमित्त कोथरूडकरांच्या अभिरुचीला साजेसे श्रीमान योगी प्रतिष्ठानचे कार्यक्रम : प्रवीण तरडे

शिवमहोत्सव २०२५ चे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन
आज ‘गोष्ट इथे संपत नाही’ पन्हाळा ते पावनखिंड ! कार्यक्रम..
कोथरूड : कोथरूडकरांची अभिरुची वेगळ्या प्रकारची आहे. त्या अभिरुचीला साजेस कार्यक्रम शिवजयंतीच्या निमित्ताने श्रीमान योगी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुष्यंत मोहोळ यांनी घेतले आहेत. शिवजयंतीनिमित्त असे उपक्रम राबवून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नव्या पिढी पर्यंत पोहचवण्याचे काम श्रीमान योगी प्रतिष्ठान करत आहेत असे प्रतिपादन अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केले.

श्रीमान योगी प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या शिवमहोत्सव २०२५ चे उद्घाटन मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार हेमंत रासने, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, उद्योजक प्रवीण बढेकर, उद्योजक अमोल रावेतकर, माजी नगरसेवक जयंत भावे, आदित्य माळवे संदीप काळे, डॉ. संदीप बुटाला, माजी नगरसेविका वसंती जाधव, हर्षाली माथवड, प्रशांत हरसुले आदी उपस्थित होते.



धीरज घाटे म्हणाले, दुष्यंत मोहोळ आणि त्यांची टीम १४ वर्षे हा उपक्रम राबवत आहेत त्याबद्दल त्यांचे कौतुक, महाराष्ट्र नाही तर देशभर महाराजांच्या जयंतीचा उत्सव साजरा केला जातोय. छत्रपतींच्या विचारांना अनुसरून काम करणारं सरकार देशात आणि राज्यात आज काम करत आहे. महाराजांना अभिप्रेत असलेले काम या युवकांच्या माध्यमातून होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे पराक्रम पुस्तके, चित्रपट यांच्या माध्यमातून पाहताना वाचताना आपल्यातलं रक्त उसळल्याशिवाय राहत नाही. दुष्यंत मोहोळ सारखा कार्यकर्ता अशा उपक्रमातून छत्रपतींच्या विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचं काम करत आहे.
श्रीमानयोगी प्रतिष्ठानने गेली १४ वर्षे शिवमूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि संस्कृतीचा वारसा जपण्याचा वसा घेतला आहे. छत्रपतींच्या प्रेरणेने समाजासाठी काहीतरी करण्याची जबाबदारी आजही आपल्यावर आहे, श्रीमानयोगी प्रतिष्ठान भविष्यातही छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा घेऊन समाजासाठी प्रेरणादायी कार्य करत राहील, असा विश्वास दुष्यंत मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केला
काल उद्घाटनाच्या दिवशी सांजसंध्या या सुरेल मैफलीने सोहळ्याची सुरुवात झाली, जिथे मराठी संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या भावगीतांनी ज्येष्ठ गायक आनंद भाटे आणि युवा गायिका शरयू दाते उपस्थितांची मने जिंकली.
आज गोष्ट इथे संपत नाही पन्हाळा ते पावनखिंड !
कोसळणाऱ्या पावसाची ती काळरात्र होती… लाखांच्या पोशिंद्याला सहीसलामत विशाळगडावर पोहचवण्याचा त्यांनी जणु विडाच उचलला होता… आणि म्हणूनच ते प्राणपणाने लढले… ही गोष्ट असीम स्वामिनिष्ठेची, धैर्यवान आणि महाप्रतापी बाजी प्रभू व बांदल मावळ्यांच्या अतुलनीय पराक्रमाची ! या पराक्रमावर आधारित आज आज गोष्ट इथे संपत नाही पन्हाळा ते पावनखिंड ! हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. पालकांनी आपल्या मुलांना घेऊन हा कार्यक्रम जरूर पाहावा आहे आवाहन काल उद्घाटन समारंभात अभिनेते प्रवीण तरडे यांनी केले आहे.








