आजपासून कोथरूडमध्ये ‘शिवमहोत्सव २०२५’ ला होणार सुरुवात.. श्रीमान योगी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन

तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोथरूड : श्रीमान योगी प्रतिष्ठान आयोजित शिवमहोत्सव २०२५ ची आजपासून कोथरूड मध्ये सुरुवात होत असून विविध कार्यक्रमांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवजयंती निमित्त उभा केल्या जात असलेल्या तुळजापूर येथील जय भवानी मातेच्या भव्य प्रतिकृतीची उत्सुकता कोथरुडकरांना लागलेली आहे.
दरवर्षी श्रीमान योगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्या माध्यमातून कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे भव्य शिवजयंती साजरी केली जाते. शिवजयंती निमित्त उभा केला जाणारा देखावा पाहण्यासाठी शहराच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी नागरिक कोथरूड मध्ये येत असतात. यावर्षीही तुळजापूर येथील जय भवानी मातेच्या भव्य प्रतिकृतीचा देखावा उभा केला जात असून गेली पंधरा दिवसांपासून या देखाव्याचे काम सुरू आहे.
आज होणार शिवमहोत्सव २०२५ चे उद्घाटन
आज १५ मार्च रोजी कोथरूडमध्ये शिवमहोत्सव २०२५ चे उद्घाटन केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते केले जाणार आहे. तर तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमांना उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ,आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने, उद्योजक पुनीत बालन, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची उपस्थित असणार आहे. सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
आज १५ मार्च रोजी पहिल्या दिवशी सांजसंध्या हा मराठी भावगीते, अभंग, नाट्यगीतांची सुरेल मैफल रंगणार आहे. जेष्ठ गायक पंडित आनंद भाटे, युवा गायिका शरयू दाते, हा कार्यक्रम सादर करणार आहेत. उद्या १६ मार्च रोजी गोष्ट इथे संपत नाही या पन्हाळा ते पावनखिंड, शिव छत्रपतींच्या गौरवशाली इतिहासाचे गोष्टीरूप सादरीकरण केले जाणार आहे. सारंग भोईरकर व सारंग मांडके हा कार्यक्रम सादर करणार आहेत. कोथरूड मधील थोरात उद्यानात सायंकाळी ६ वाजता हे कार्यक्रम पार पडणार आहेत. तर १७ मार्च रोजी जागर भक्ती शक्तीचा तसेच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व नादब्रह्म ढोलपथकाचे स्थिरवादन असणार आहे. संध्याकाळी स्वामीसेवा भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम असणार आहे.






