महिलांचा अपमान करणे ही भाजपची संस्कृती : दिपाली धुमाळ यांचा भाजपवर हल्लाबोल

पुणे : pune city महिला कलावंतांचा अपमान करणारे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व त्यांचा भाजप पक्ष म्हणजे महिलांचा अनादर करणारा पक्ष आहे व हीच त्यांची संस्कृती आहे. अशा शब्दात पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी दरेकर यांना फटकारले आहे. Insulting women is BJP’s culture: Deepali Dhumal’s attack on BJP
शिरूर येथे बोलताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची जीभ घसरली असून सुप्रसिद्ध लावणी कलावंत सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे यांच्यासह काही कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत . या प्रवेशाबाबत बोलताना प्रवीण दरेकर यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर यांनी केलीय. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्याविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्या दिपाली धुमाळ यांनी दरेकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
धुमाळ यांनी म्हंटले आहे की या अगोदरही भाजप नेत्यांनी अनेकवेळा महिलांबाबत अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे महिलांचा अपमान करणे ही भजपची संस्कृती असल्याचे यातून सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे भाजप महिला नेत्या मात्र यावर काहीच बोलताना दिसत नसल्याने आश्चर्य वाटत आहे. महिलांचा अपमान करणाऱ्या दरेकर यांना महिला नक्कीच त्यांची जागा दाखवतील.




