
“खडकीच्या सेंट जोसेफ शाळेतील सहा विद्यार्थिनींची शालेय हॉकीमध्ये राष्ट्रीय स्तरावर निवड, ऑल इंडिया साप्रस मिनी मॅरेथॉनच्या वतीने विद्यार्थिनींसह पालक व प्रशालेचा “विशेष सन्मान”
पुणे – पुण्याच्या खडकी येथील सेंट जोसेफ मुलींच्या शाळेतील सहा विद्यार्थिनींची हॉकी खेळासाठी शालेय राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. ऑल इंडिया साप्रस मिनी मॅरेथॉन यांच्या वतीने या विद्यार्थिनी त्यांचे पालक तसेच त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक यांचा शाळेत नुकताच विशेष सन्मान करण्यात आला.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अभय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर शीला सायमन, सिस्टर स्टेफी, सामाजिक कार्यकर्ते निखिल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑल इंडिया साप्रस मिनी मॅरेथॉनचे मुख्य संयोजक दीपक बिडकर, अभिषेक बटेल्लू , सुकेश जाधव, अनिकेत सूर्यवंशी, राकेश बट्टेलू, आकाश बद्दप, स्वप्निल ढेरे ,आदेश रावतू , सचिन आहेर, विल्सन शेलार यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या “विशेष सन्मान सोहळ्या”त शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर शीला सायमन यांच्यासह क्रीडाशिक्षक राणी गाडेकर, प्रशिक्षक कोच भूषण गणेश ढेरे तसेच शालेय राष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळात निवड झालेल्या स्वरा गजरमल, जानवी चव्हाण स्वानंदी कदम, पर्वणी कणसे , अलिझा पठाण ,मिस्कत मुकदम यांचा तसेच त्यांच्या पालकांचा देखील सन्मान करण्यात आला.

खडकी परिसराची आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा नगरी म्हणून ओळख असून अनेक नामवंत खेळाडू या भागातून निर्माण झालेले आहेत. प्रशालेतील गुणवंत विद्यार्थिनींच्या माध्यमातून देशाला चांगले खेळाडू मिळावेत यासाठी ऑल इंडिया साप्रस मिनी मॅरेथॉनच्या वतीने विद्यार्थिनींना सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्यात येईल अशी माहिती मुख्य संयोजक दीपक बिडकर यांनी यावेळी दिली. यामध्ये विद्यार्थिनींसह त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका व त्यांचे पालक यांचा फार मोठा वाटा असल्यामुळे त्यांचे ते देखील कौतुक करावे या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सुकेश जाधव यांनी सांगितले.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत विद्यार्थिनींनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद असून योग्य मार्गदर्शन व सहकार्य आणखी चांगले गुणवंत खेळाडू आपल्या प्रशालेच्या माध्यमातून निर्माण होतील असे मत निखिल गायकवाड यांनी व्यक्त केले. पालक इलियास पठाण, फिरोज शेख ,नासिर मुकादम यांनी देखील मनोगत व्यक्त केले. प्रतिनिधी मुख्याध्यापिका सिस्टर शीला यांनी या विशेष सन्मान उपक्रमाबद्दल साप्रस मिनी मॅरेथॉन व संयोजकांचे आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन सुकेश जाधव यांनी केले आभार राणी गाडेकर यांनी मानले.









