
अल्पना वरपे यांची कचरा संकलन केंद्र स्थलांतराची मागणी
कोथरूड : कोथरूड डेपो येथील इंदिरा शंकरनगरी जवळील कचरा डेपो हालवण्यात आला असला तरी या जागेवर कचरा संकलन केंद्र सुरूच राहिल्याने यातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास आजूबाजूच्या सोसायट्यांना आतापर्यंत सहन करावा लागत आला आहे. कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो डेपो सुरू झाल्याने येथील परिस्थिती बदलल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला, मात्र येथे कचरा संकलन केंद्र सुरूच असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे कचरा संकलन केंद्र लवकरात लवकर स्थलांतरीत करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेविका अल्पना वरपे यांनी केली आहे.
या संदर्भातील निवेदन अल्पना वरपे यांच्याकडून महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या उपयुक्त राऊत यांच्याकडे देण्यात आले आहे व याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वरपे यांनी म्हंटले आहे की, पूर्वी कोथरुड हे शहरापासून दूर कमी लोकसंख्या असलेले उपनगर होते, त्यामुळे या भागात कचरा डेपो करण्यात आला. कालांतराने हा भाग विकसित होऊन लोकसंख्या वाढली व कचरा डेपोमुळे परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना अनेक वर्षे सामोरे जावे लागले. या भागातील प्रॉपर्टीला देखील त्यामुळे योग्य भाव मिळत नव्हते. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी आंदोलन उभारून येथील कचरा डेपो हटवण्यास प्रशासनाला भाग पाडले. कचरा डेपो हलला मात्र कचरा संकलन केंद्र सुरूच राहिले.

आता या जागेवर मेट्रो कार डेपो करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी कचरा संकलन केंद्रामुळे त्रास कमी झालेला नाही. संकलन केंद्रामुळे कचरा वाहतूक चालू असल्याने बाहेरील मुख्य पौड रस्त्यावर कचर्यातील द्रव पदार्थ सांडत असल्याने वाहने घसरून अपघात घडत आहेत. तसेच कचरा संकलन केंद्र असल्याने अद्याप या दुर्गंधीतून पूर्णपणे नागरिकांची सुटका झालेली नसल्याचे वरपे यांनी सांगितले.
सदर कचरा संकलन केंद्र बावधन, जुना जकात नाका येथे हलविण्यात येणार होता, परंतु शेजारी रामनदी असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने हितकारक नसल्याने स्थानिक नागरिकांनी सदर केंद्राला विरोध केला व त्यामुळे अद्याप नवीन जागा उपलब्ध न झाल्याने पूर्वीच्या जागेवरच अद्याप संकलन केंद्र चालू आहे. कोथरूड डेपो परिसरात चालू असलेले सदर कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप गरजेचे आहे, तरी सदर कचरा संकलन केंद्रासाठी त्वरित जागा उपलब्ध करून द्यावी व सदर केंद्र दुसऱ्या जागेत स्थलांतरीत करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात याव्यात अशी मागणी वरपे यांनी निवेदनाद्वारे संबधित विभागाकडे केली आहे.


