आंतरराष्ट्रीय

अमेरिकेतील पिट्सबर्गमध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष; गोवर्धन पर्वताचा देखावा ठरला विशेष आकर्षण

पिट्सबर्ग, अमेरिका : पिट्सबर्ग मराठी मंडळातर्फे आयोजित गणेशोत्सवाचा शुभारंभ १९ सप्टेंबर रोजी हिंदू जैन मंदिर येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात झाला. पिट्सबर्ग शहर तसेच परिसरातील विविध उपनगरांतून सुमारे ३५० ते ४०० मराठी बांधव या सोहळ्यासाठी एकत्र आले.

Img 20260222 wa00064513382578852640289

पारंपरिक ढोल-ताशा आणि लेझीमच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विधिवत गणपती स्थापना आणि आरती झाली. आरतीनंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

यंदाच्या गणेशोत्सवातील मुख्य आकर्षण ठरले ते “गोवर्धन पर्वत गिरिधारी कृष्ण कन्हैया” या संकल्पनेवर आधारित भव्य प्रकाश, ध्वनी आणि चलतचित्र सादरीकरण, हालचाली, प्रकाशयोजना आणि ध्वनी यांच्या सुंदर मिलाफातून साकारलेला हा देखावा पाहून उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. अमेरिकेत राहूनही भारतीय संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या या उपक्रमाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Pxl 20260919 1425574898752105353398045457
पारंपरिक ढोल-ताशा आणि लेझीमच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्यात आले.

पिट्सबर्ग मराठी मंडळाचे अध्यक्ष यशोधन डोंगरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (BMM) अध्यक्ष राहुल देशमुख यांनी उपस्थित भाविक, स्वयंसेवक आणि कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

पिट्सबर्ग मराठी मंडळाचा गणेशोत्सव पुढील सात दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह सुरू राहणार आहे. २६ सप्टेंबर, शनिवार रोजी सायंकाळी गणेश विसर्जन करण्यात येणार आहे.

अमेरिकेतील पिट्सबर्गमध्ये महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि उत्सवांची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या गणेशोत्सवाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा मराठी समाजाच्या सांस्कृतिक एकोप्याचे दर्शन घडवणारा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये