पुणे शहर

कोथरूड-बावधनमध्ये महिलांना कौशल्यासोबत रोजगाराची संधी

टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू ; कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय आणि हर्षदीप फाउंडेशनचा उपक्रम

पुणे : ‘स्वच्छता ही सेवा-२०२६’, ‘स्वच्छ भारत विकसित भारत’ आणि ‘स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मिशन’ अंतर्गत कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय आणि हर्षदीप फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ व नाविन्यपूर्ण वस्तू तयार करणे’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासोबतच कष्टकरी महिलांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

प्रभाग क्रमांक ३१, कोथरूड उपनगरातील विशेषतः डहाणूकर कॉलनीतील लक्ष्मीनगर तसेच विविध श्रमिक वसाहतींमधील महिलांना टाकाऊ कापडापासून विविध उपयोगी वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने विविध ठिकाणी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

Img 20260222 wa00064513382578852640289

महेश विद्यालय, सरस्वती शाळा, लोढा बालक मंदिर, छत्रपती संभाजी शाळा, मोरे विद्यालय यांसह विविध शाळांमध्येही या उपक्रमांतर्गत कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. हर्षदीप फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्षा ज्योती बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर परिसरातील महिलांना टाकाऊ कपड्यांपासून नाविन्यपूर्ण वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे महिलांना कौशल्य विकसित करण्याबरोबरच रोजगाराची संधी निर्माण होत आहे.

दसरा, दिवाळी यांसारख्या सणांच्या काळात घराची साफसफाई करताना नागरिकांकडून जुने कपडे, गोधड्या, चादरी, सतरंज्या, जीन्स, मुलांचे कपडे आदी वस्तू मोठ्या प्रमाणात कचऱ्यात टाकल्या जातात. या वस्तू नदी-नाले किंवा कचऱ्यात न जाता त्यांचे संकलन करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी विविध ठिकाणी संकलन केंद्रे उभारण्यात येतात. संकलित केलेले कपडे हर्षदीप फाउंडेशनकडे देण्यात येतात.

या टाकाऊ कापडापासून तोरण, फ्रेम, चौरंग, नैवेद्याच्या ताटांची झालर, पाकिटे, कापडी पिशव्या, उशीची कव्हरे, पायपुसणी, रोटी मॅट, श्रीगणेशाचे आसन, टिफिन पिशव्या, लटकण्या अशा विविध वस्तू तयार करण्यात येतात. तयार वस्तू अल्प दरात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याने महिलांना उत्पन्नाचे साधनही मिळत आहे.

या उपक्रमातून केवळ कापडाचा पुनर्वापर होत नसून नागरिकांमध्ये कापड, प्लास्टिक, कागद, औषधांच्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या आदी वस्तू कचऱ्यात न टाकता त्यांचा योग्य पद्धतीने पुनर्वापर किंवा विलगीकरण करावे, याबाबत जनजागृती केली जात आहे. परिणामी सुक्या कचऱ्यात जाणाऱ्या कापडाचे प्रमाण कमी करण्यास आणि घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यास मदत होत आहे.

या उपक्रमासाठी घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संतोष वारुळे, परिमंडळ क्रमांक २ चे उपायुक्त अविनाश सकपाळ आणि महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक करण कुंभार, किरण जाधव, गणेश साठे, गणेश चोंधे, राजेश आहेर, लक्ष्मीकांत कुलकर्णी, प्रमोद चव्हाण, निसार शेख, गणेश घोलप, दत्तात्रय दळवी, जया सांगडे तसेच मोकादम वैजीनाथ गायकवाड आणि आण्णा ढावरे यांनी परिश्रम घेतले.

हर्षदीप फाउंडेशनच्या मोहिनी कांबळे, दीप्ती ओक, सोनी चव्हाण, किरण बापट, सुप्रिया लोहकरी, बालिका हिंगे आणि योगिता देशपांडे या प्रशिक्षक महिलांनीही कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये