पुणे शहर

गणेशोत्सवातून महिला सक्षमीकरणाचा जागर! ‘सिद्धीचा गणपती’ची अनोखी वाटचाल

बावधनच्या ‘सिद्धीचा गणपती’ची राज्यभरात स्वतंत्र ओळख

महिलांच्या नेतृत्वाखाली सामाजिक उपक्रम आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची अनोखी परंपरा

पुणे : गणेशोत्सव म्हणजे भक्ती, उत्साह आणि सार्वजनिक सहभागाचा उत्सव. मात्र, याच उत्सवाच्या माध्यमातून महिलांना नेतृत्वाची संधी, उद्योजकतेला व्यासपीठ आणि समाजोपयोगी उपक्रमांना चालना देण्याचा वेगळा प्रयोग बावधन येथील ‘सिद्धीचा गणपती महिला मंडळा’ने उभा केला आहे. त्यामुळे केवळ गणेशोत्सव साजरा करणारे मंडळ अशी ओळख न राहता, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव अशी सिद्धीच्या गणपतीची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

Img 20260222 wa00064513382578852640289

संस्थापक अध्यक्षा पीयूषा किरण दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचा कारभार महिलांकडूनच चालविला जातो. डॉक्टर, वकील, इंजिनिअर, चार्टर्ड अकाउंटंट यांच्यासह विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिला गणेशोत्सवाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर एकत्र येतात. उत्सवाच्या माध्यमातून महिलांमध्ये संवाद, नेटवर्किंग आणि परस्पर सहकार्याची नवी साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न येथे केला जातो.

उत्सवातून ६०० हून अधिक उद्योजक महिलांना व्यवसायाचे व्यासपीठ

महिलांचे संघटन केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित न ठेवता त्याला उद्योजकतेची दिशा देण्यात आली आहे. मंडळाशी जोडलेल्या उद्योजक ग्रुपमध्ये सुमारे ६०० ते ७०० महिला सहभागी आहेत.
या माध्यमातून महिला उद्योजकांना आपल्या व्यवसायाची माहिती इतरांपर्यंत पोहोचविणे, ग्राहक व व्यावसायिक संपर्क वाढविणे आणि एकमेकींच्या व्यवसायाला प्रोत्साहन देणे शक्य होत आहे. त्यामुळे गणेशोत्सव हे महिलांसाठी व्यवसायवृद्धी आणि नेटवर्किंगचे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.

समाजोपयोगी उपक्रमांनाही प्राधान्य

गणेशोत्सवाच्या काळात मंडळाकडून केवळ धार्मिक कार्यक्रमांवर भर न देता समाजोपयोगी उपक्रमांनाही प्राधान्य दिले जाते. आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून उत्सवाचा सामाजिक उपयोग वाढविण्याचा प्रयत्न केला जातो.

‘उत्सव आपला, पण त्याचा फायदा समाजालाही’ या विचारातून विविध उपक्रम राबविले जात असल्याने मंडळाच्या कामाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली आहे.

डीजेला पर्याय; पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्सव

आजच्या काळातील ध्वनिप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने डीजेला दूर ठेवत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले आहे. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करताना किंवा विसर्जनाच्या वेळी मोठ्या मिरवणुका न काढण्याची परंपराही मंडळाने जपली आहे. याशिवाय मूर्तीचे विसर्जन करण्याऐवजी गणेशमूर्ती दान करण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम राबविला जातो. भक्ती, परंपरा आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल साधण्याचा हा प्रयत्न लक्षवेधी ठरतो.

सलग तीन वर्षे ‘मोरया’ पुरस्काराचा सन्मान

सिद्धीच्या गणपती महिला मंडळाच्या या वेगळ्या वाटचालीची दखल पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने घेतली आहे. मंडळाला सलग तीन वर्षे ‘मोरया’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. महिला सहभाग, सामाजिक उपक्रम आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या वेगळ्या कार्यपद्धतीला मिळालेली ही महत्त्वाची पावती मानली जाते.



दरवर्षी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मंडळाला भेट

मंडळाच्या उपक्रमांची दखल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही घेतली आहे. अमृताताई फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे, खासदार मेधाताई कुलकर्णी, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेबदादा पाटील दानवे, लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, सिंबायोसिसच्या कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, अभिनेते प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे, स्मिता ताई पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मंडळाला भेट देऊन उपक्रमांची माहिती घेतली आहे.

‘महिलांचा गणपती’ ते सामाजिक परिवर्तनाचे व्यासपीठ

महिलांच्या नेतृत्वातून उभा राहिलेला उत्सव, शेकडो महिला उद्योजकांना मिळणारे व्यासपीठ, आरोग्य व रक्तदानासारखे सामाजिक उपक्रम, डीजेमुक्त पारंपरिक उत्सव आणि पर्यावरणपूरक मूर्तीदानाची भूमिका—या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून ‘सिद्धीचा गणपती’ ही केवळ गणेशमूर्ती किंवा उत्सवाची ओळख राहिलेली नाही.

महिलांच्या सहभागातून भक्तीला सामाजिक जाणीवेची आणि उत्सवाला परिवर्तनाची दिशा देणारे एक वेगळे व्यासपीठ म्हणून बावधनच्या सिद्धीच्या गणपतीकडे पाहिले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये