कर्वेनगरमध्ये सीमा भिंत कोसळून वाहनांचे मोठे नुकसान

सुदैवाने जीवितहानी नाही.
कर्वेनगर : कर्वे समाजसेवा संस्थेची सीमा भिंत कोसळून रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. पावसाच्या पाण्यामुळे भिंत खचून शनिवारी सायंकाळी साडे नऊच्या सुमारास ही घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या भिंतीला लागूनच वस्ती विभगातील लहान मुले खेळत असतात. सुदैवाने त्यादिवशी त्याठिकाणी कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. संस्थेने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
कर्वे समाजसेवा संस्थेसमोर असणारा श्रमिक वसाहत परिसर हा मुळातच दाट लोकवस्ती असणारा परिसर आहे.
याच भागात मिलेनियम स्कूल, मराठवाडा इंजिनियरिंग कॉलेज असल्याने हा परिसर प्रचंड रहदारीचा आहे. अरुंद रस्ता असल्याने स्थानिकांना अवैध पार्किंग, मोठमोठ्या वाहनांची वर्दळ आदी बाबींचा त्रास सहन करावा लागत आहे. याच रस्त्यावर फळभाज्या विक्रेते, हातगाडीवाल्यांनी देखील अतिक्रमण केल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना बाहेर पडणे देखील जिकिरीचे बनले आहे.
कर्वे समाजसेवा संस्थेची सीमा भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही संस्थेने सर्व सीमा भिंतीची पाहणी करणे गरजेचे आहे. कारण श्रमिक वसाहतीसारख्या दाट लोकवस्ती असणाऱ्या परिसराला लागूनच ही दगडी सीमा भिंत आहे. चुकून जर अशी घटना पुन्हा घडली तर यात नागरिकांचे प्राणही जाऊ शकतात.
– सचिन फोलाने
उपाध्यक्ष -भाजपा युवा मोर्चा पुणे शहर










