कबूतर चोरीचा आरोप करत बालकाला बेदम मारहाण; एकास अटक

पुणे : महापालिकेच्या अनुसयाबाई सावंत शाळेच्या आवारात एका अल्पवयीन बालकाला इतर दोन मुले कबूतर चोरल्याच्या वादातून पट्ट्याने बॅटने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ मारहाण करणाऱ्यांच्या तिसऱ्या साथीदाराने काढला. पालकांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी येरवडा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. मात्र या घटनेमुळे पुण्यातील महापालिका शाळांच्या आवारात नेमकं काय सुरू असतं आणि यावर कुणाचा वचक आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कबूतर चोरीचा आरोप करत शाळेच्या आवारात अल्पवयीन बालकाला पट्ट्याने व बॅटने मारहाण केल्याचा हा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी येरवड्यात घडला. या प्रकरणी रात्री उशिरा पालकांनी येरवडा पोलिसांकडे नोंद केली. जखमी बालकाच्या वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आदित्य मोहिते (वय. 18, रा. गणेश नगर, येरवडा) याला अटक केली आहे. अन्य दोन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील गोल्फ क्लब मैदानाजवळ असणाऱ्या शाळेच्या आवारात ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पालकांनीही आपली मुले घरात आणि घराबाहेर काय करतात, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.



