कायम कामगारांप्रमाणे रोजंदारी व कंत्राटी कामगारांनाही बोनस, सानुग्रह अनुदान व कोविड भत्ता द्यावा : दिपाली धुमाळ

पुणे : pune city पुणे महानगरपालिकेतील सर्व कायम कामगारांना बोनस व सानुग्रह अनुदान देण्याचा चांगला निर्णय महापालिकेने घेतला आहे, जसे कायम कामगार आहेत त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या विभागात रोजंदारी व कंत्राटदारामार्फत कंत्राटी कामगारही काम करीत आहेत. त्यांनाही बोनस व सानुग्रह अनुदान व कोविड भत्ता देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.
या संदर्भातील निवेदन धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या रोजंदारी व कंत्राटदारामार्फत कंत्राटी कामगारही काम करीत आहेत.
त्यामध्ये सुरक्षा रक्षक, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, स्मशानभुमीत काम करणारे कामगार, मलनिसा:रण विभाग, झाडूखाते व इतरही सर्व खात्यांमध्ये कंत्राटी कामगार काम करीत आहेत. या सर्व कामगारांनी आपल्या जीवाची बाजी लावून कोरोना काळामध्ये काम केले आहे. त्यामध्ये काही कंत्राटी कामगारांनी आपला जीव गमावला आहे. त्याची झळ त्यांच्या कुटुंबांनी भोगली आहे.
आपले कर्तव्य प्रामाणिकपणे निभावणाऱ्या या सर्व कंत्राटी
कामगारांना कायम कामगारांप्रमाणे ८.३३ टक्के बोनस व १७,०००/- सानुग्रह अनुदान देण्यात यावे व कोविड
कालावधीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविड भत्ताही देण्यात यावा. म्हणजे या सर्व कामगारांनाही त्यांनी
केलेल्या कामाचे मोल मिळाल्यासारखे होईल.
तरी याबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.




