रानगवा गेला..पण नागरिकांच्या गर्दीने का प्रशासनाच्या हलगर्जीने ?

कोथरूडमधील रानगवा रेस्क्यू ऑपरेशन का अपयशी ?
विनायक बेदरकर
पुणे : कोथरुड मधील महात्मा सोसायटीत आलेला रानगवा प्रशासनाच्या रानगवा रेस्क्यू ऑपरेशन’ या थरारक मोहिमेत मृत्यूमुखी पडला. सर्व नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. नागरिकांच्या गर्दीने या रानगव्याचा मृत्यू झाला. अशी निषेधाची चर्चा प्रसारमाध्यमांतून सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पसरली. पण नागरिकांच्या गर्दीने का प्रशासनाच्या हलगर्जीने रानगव्याचा मृत्यू झाला ? या रानगव्याला वाचवता येणे शक्य नव्हते का ? हा मूळ प्रश्न अनुत्तरितच राहतोय.
कोथरूड सारख्या शहरी दाट लोकवस्ती असलेल्या भागात रानगवा मुळात आला कोठून आणि आला तर त्याला सुखरूप जंगलात सोडण्यासाठी आखलेल्या मोहिमेत चूक कशी झाली. याचा बारकाईने अभ्यास होणे गरजेचे आहे. शहरात वन्यप्राण्यांचे आगमन होणे ही गोष्ट आता नवीन राहिली नाही. मात्र वनखाते आणि संबंधीत प्रशासनाच्या वतीने आयोजित मोहिमेत नागरिकांच्या गर्दीमुळेच गव्याला वाचविण्यात अपयश आले हे कारण फारसे पटणारे नाही. कारण अतिउत्साही गर्दीला नियंत्रित करायचे कामही प्रशासनाचेच आहे.
कोथरुडमध्ये रानगव्याचे दर्शन झाल्याचे समजल्यानंतर पोलिस, वनखाते , पुणे महापालिका आणि अग्निशमन दलाचे अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मोहिमेला सुरुवात झाली. एका मोकळ्या जागेत असलेला गवा पकडण्याची तयारी सुरू झाली. यावेळी महात्मा सोसायटी परिसरात नागरिकांना आत मध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे त्या ठिकाणी फारशी गर्दी झाली नाही. मात्र या मोकळ्या जागेच्या कंपाउंड वरून बाहेर पडून गवा महात्मा सोसायटीतून बाहेर पडून रस्त्याने धावू लागला. आणि त्याला पाहण्यासाठी अतिउत्साही लोकांची गर्दी गोळा झाली. आणि गवा बिथरून सैरावैरा पळत सुटला.
या सर्व प्रकारात हा रानगवा जखमी झाला होता. तसेच त्याला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन ही मारण्यात आले होते. त्यामुळे तो दमून अखेर बेशुद्ध पडला आणि पकडला गेला. जर त्या रानगव्याला महात्मा सोसायटीतच पकडण्यात वनखात्याला यश आले असते तर त्याचे प्राण कदाचित वाचले असते. मात्र हे घडायचे नव्हते. कारण शहरात आलेल्या वन्यजीवांना पकडण्यासाठीची वनखात्याची प्रशिक्षित टीम पुणे शहरात नाही का ? या मोहिमेसाठी पाच किलोमीटर अंतरामध्ये तात्पुरती संचारबंदी लागू करता आली नसती का ? प्राणी मित्रांची घेऊन योग्य पध्दतीने गवा पकडून त्याचा प्राण वाचवता आला नसता का ? अशी अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीतच आहेत.
याशिवाय हा रानगवा कोथरुड मधील महात्मा सोसायटी सारख्या शहरी भागात आला कसा आणि कोठून ? या प्राणिमित्रांच्या माहितीनुसार कोल्हापूर मधील राधानगरी धरण परिसरातील रानगव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या दाजीपूर अभयारण्य येथून महाबळेशवर मार्गे हा गवा मुळशीमार्गे आला असण्याची शक्यता आहे. याशिवाय पुण्यातील कात्रज भागात यापूर्वी रानगवे दिसले आहेत. त्याच्या बातम्याही आल्या आहेत. पण कोथरूडमध्ये तो प्रथमच दिसला आहे. याबाबतीतहि अभ्यास होणे गरजेचे आहे.







