मनसे आज पत्ते उघडणार ; कसब्यात भाजपला पाठिंबा जाहीर करणार ?

पुणे : पुण्यातील कसबा पोट निवडणूकीमध्ये भाजपचे हेमंत रासने आणि कॉग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. अशातच गुलदस्त्यात भूमिका असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पत्ते आज उघडले जाणार असून मनसे कडून भाजप उमेदवार हेमंत रासने यांना पाठिंबा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
कसबा पोट निवडणुकीच्या आखाड्यात जशी जशी मतदानाची तारीख जवळ येत आहेत. तसे भाजप आणि महाविकास आघाडीकडून नविन नविन डाव प्रतिडाव करण्यात येत आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्षाने आपली भुमिका जाहीर केली आहे. मात्र मनसे ने आपली भुमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत भाजप उमेदवार हेमंत रासने यांना पाठिंबा जाहीर करण्याविषयी चर्चा सुरू होती. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे.
मनसेच्या उमेदवाराला 2019 साली झालेला विधानसभा निवडणुकीत आठ हजार मते मिळाली होती.
रासने आणि धंगेकर यांच्या मध्ये होणारी चुरशीची निवडणूक लक्षात घेता मनसे ने रासने यांना पाठिंबा जाहीर केला तर या निवडणूकीत रासने यांचे पारडे जड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.




