श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाच्या वतीने मोडी लिपी प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन…

उपक्रम आठवड्यात २ दिवस असे पुढील २ महिने चालणार आहे.
पुणे : श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ पुणे आयोजित मोडी लिपी प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे करण्यात आले होते.
हा उपक्रम मंडळा मार्फत न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग आणि माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातील इयत्ता ८ वी, ९ वी च्या विद्यार्थ्यासाठी राबवला जात असून यात प्रत्येक शाळेतील ५० विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे.

सदर उपक्रमाचे उद्घाटन आज पार पडले. या कार्यक्रमाला रमणबाग शाळाप्रमुख श्रीमती आशा माने या अध्यक्ष स्थानी होत्या तसेच न्यू इंग्लिश टिळक रोड शाळाप्रमुख राव मॅडम आणि माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या शाळाप्रमुख बनकर मॅडम उपस्थित होत्या.मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार मंडळाचे अध्यक्ष मंगेश राव यांनी केले
माधव जगताप, उपयुक्त पुणे महानगर पालिका हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी मोडी लिपी आणि शिवाजी महाराज यासंदर्भात विद्यार्थांना मार्गदर्शन केले तर दुसरे पाहुणे मोडी लिपी तज्ञ राजेंद्र ढुमे यांनी विद्यार्थ्यांना मोडी लिपीचा इतिहास, त्याचे महत्व समजून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाचे योगेंद्र भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन अजिंक्य साठे यांनी केले. या ३ ही शाळेत हा उपक्रम आठवड्यात २ दिवस असे पुढील २ महिने चालणार आहे, याचबरोबर विविध मान्यवरांची व्याख्याने आणि वारसा सहल विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाणार आहे.
अभिजात दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषेचे मोडी ही एक वेगळी लिपी आहे आणि त्याचे ऐतिहासिक महत्व खूप आहे, आपला मराठ्यांच्या इतिहास हा या मोडी लिपीतच लिहिला गेलेल्या पत्रसंग्रहातून उलगडला गेला आहे त्यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांना या लिपीचा परिचय व्हावा, त्यांना इतिहासात रस निर्माण व्हावा आणि आपल्या इतिहासाचा सखोल अभ्यास व्हावा असा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे अजिंक्य साठे यांनी नमूद केले.



