महाराष्ट्र केसरी विजेत्यास देण्यात येणारी गदा संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी स्वीकारली.

पुणे : संस्कृती प्रतिष्ठान आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठीच्या विजेत्यास दिली जाणारी मानाची चांदीची गदा आज माजी खासदार अशोक मोहोळ यांच्याकडून संयोजक या नात्याने संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वीकारली.
महाराष्ट्र केसरीचे जनक स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ चांदीच्या गदा दरवर्षी महाराष्ट्र केसरी विजेत्यास दिली जाते. मोहोळ कुटुंबियांकडून संयोजकांकडे गदा सुपूर्द करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे.
यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे मोहोळ कुटुंबियांकडून मोहोळ कुटुंबीयांकडे ही गदा सुपूर्द करण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ संस्थापक अध्यक्ष असलेल्या संस्कृती प्रतिष्ठानकडे महाराष्ट्र केसरीचे संयोजन आल्याने हा अनोखा योगायोग जुळून आला. गदा स्विकारण्यापूर्वी स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन गदा पूजन करण्यात आले. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी माजी खासदार अशोक मोहोळ यांचेकडून ही गदा स्वीकारली.










