राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा देशात ‘मॉडेल’ म्हणून उभी करा : अजित पवार

पुणे : तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्यातील नागरिकांना शुद्ध, स्वच्छ पाणी दिले गेले पाहिजे. नागरिकांना पाणी देत असताना त्यांच्या आरोग्याचा प्राधान्याने विचार करत राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा देशात ‘मॉडेल’ म्हणून उभी करण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या. प्रयोगशाळा उभारणीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.Establish state level water testing laboratory as a ‘model’ in the country: Ajit Pawar
पवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन वडगाव बुद्रुक येथे झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ संजय चहांदे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले, प्रयोगशाळेच्या इमारतीचे काम करताना कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. पुण्याचा वैभवात भर पाडणारी वास्तू म्हणून उभारणी झाली पाहिजे असे म्हणत राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या माध्यमातून दर्जेदार यंत्रणा उभी राहत आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून जनतेची तहान भागविण्याचे काम केले जाते. नागरिकांना शुद्ध, स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचा कामी यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करत राज्यातील गोरगरीब, वंचित नागरिकांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले तर आभार अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ यांनी मानले




