‘शिवाई’नंतर आता ‘एसटी’च्या ताफ्यात ई- शिवनेरी; पुण्यातून विविध मार्गावर धावणार

पुणे : पहिली ई-बस शिवाई पुण्यातून धावल्यानंतर आता ‘एसटी’च्या ई- शिवनेरीचा प्रवास लवकरच सुरु होणार आहे. पुणे विभागाला ९६ ई-शिवनेरी बस मिळणार आहेत. त्यासाठी नव्या चार्जिंग स्टेशनचे काम सुरु झाले आहे. पुण्याहून ई-शिवनेरी दादर, परळ, ठाणे व बोरिवली या ठिकाणी धावणार आहे. यासाठी पुण्यातील चार्जिंग स्टेशनमध्ये १७ चार्जर उभारले जाणार आहेत.
पुणे-नगर ई- शिवाई बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे लक्षात घेता एसटी प्रशासन आता ई-शिवनेरी बसेस सुरु करणार आहे. त्यासाठी ओलेक्ट्रा कंपनीच्या बसेस वापरल्या जाणार आहे. त्यासाठी हैदराबाद येथे बसेसची निर्मितीही सुरु केली आहे. या नव्या बसेस आताच्या शिवनेरीच्या तुलनेने खूपच अत्याधुनिक आहेत. तसेच ग्रीनसेल मोबिलिटीने तयार केलेल्या ई- शिवाईच्या तुलनेत अधिक आरामदायक असतील. यामधून प्रवास करताना प्रवाशांना खड्ड्यांतून बस गेल्यास हादरे बसणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे.
डिझेलवर धावत असलेल्या शिवनेरी होणार हद्दपार
ई- शिवनेरी बस आता धावणार असल्याने सध्या डिझेलवर धावत असलेल्या शिवनेरी लवकरच सेवेतून बाद होण्याची शक्यता आहे. पुणे विभागाला जुलै महिन्यात आणखी १७ ई-बस मिळणार आहे. त्यामुळे पुणे-नगर मार्गासह पुणे-कोल्हापूर व पुणे-नाशिक मार्गावरही ई-शिवाई धावणार आहे. सध्या चार बसेसच्या माध्यमातून ही सेवा सुरु आहे. पुण्याला ९६ ई-बस मिळणार आहेत. त्यादृष्टीने तयारी सुरु आहे. या बसेस तुलनेने अधिक आरामदायक असतील. त्यामुळे प्रवाशांना वेगळा अनुभव मिळेल.