महाराष्ट्र

आरे वरून मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका, खोटी झाडे लावणे आम्हाला जमत नाही.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून साधला जनतेशी संवाद

आरे येथील मेट्रो कारशेड आता कांजूरमार्गला होणार

मुंबई : मुंबईतील आरे येथे होणारे कारशेड कोठे हालवले जाणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. त्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली असून आरे येथे होणारे मेट्रोचे कारशेड आता कांजूरमार्ग येथे होणार असल्याची माहिती त्यांनी आज दिली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. कोरोनाचा प्रादुर्भाव,  माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम,  शेती, कृषी धोरण, मंदिरे, जिम या संबधित मुद्द्यांवर त्यांनी या संवादात भाष्य केले.

आहे ते कापायच आणि ५०० कोटी झाडं लावल्याच्या खोट्या थापा मरायाच्या. अशी खोटी झाड लावायचे काम आम्हाला जमत नाही असं म्हणत ठाकरे यांनी विरोधकांवर आज आरे प्रकरणावरून निशाणा साधला.

ठाकरे म्हणाले, मागील सरकारमध्ये असताना आरे कार शेडचा मुद्दा ऐरणीवर आल्यापासून आमचा त्याला विरोध होता. पर्यावरणवाद्यांनी येथील जीवसृष्टी वाचावी म्हणून आंदोलन केली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. हा विषय रेटून नेत रात्रीच्या रात्री झाडे कापण्यात आली. सत्ता आल्यानंतर आपण पर्यावरणवाद्यांवरील गुन्हे मागे घेतले आहेत. आरे मधील आहे ते पर्यावरण जपण्याचं एक ऐतिहासिक काम आपण केलं आहे आणि त्याचं समाधान वाटत आहे असे ते म्हणाले. आरेच्या ६०० एकर जागेत आपण जंगल घोषित केलं होत पण जंगलाची व्याप्ती जवळपास ८०० एकर  एवढी झाली आहे. हे भावी पिढीसाठी महत्वाचं ठरणार आहे.

अरे जागेवर मेट्रो साठी केलेला खर्च कोठेही वाया जाणार नाही याची खबरदारी आपण घेतलेली आहे. कांजूरमार्ग येथील नव्या मेट्रो कारशेडसाठी दिलेली शासकीय जागा एकही पैसा न घेता देलेली आहे. त्यामुळे जनतेचा पैसा कोठेही वाया जाणार नाही याची काळजी घेतली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

कोकणातील निसर्ग वादळ व विदर्भात आलेल्या पूर परिस्थितीत नुकासन झालेल्यांचे पंचनामे करून मदत केली गेली आहे. जी पिके येतील त्याबाबत शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे सरकारने तुम्हाला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही असा विश्वास देताना शेतामध्ये आता जे विकल ते पिकेल यासाठी आपण जनजागृती करत आहोत हमखास भाव मिळेल ते पिकवण्यासाठी सरकारचा आग्रह असल्याचा ठाकरे यांनी सांगितले.

साठवणूक केंद्र उभारण्याचा निर्णय शेतकऱ्याला वर्क फ्रॉम होम करून जमेल का त्याला आहे त्या परिस्थितीत काम करावं लागतं म्हणूनच पीक कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय आपण घेतला. कांदा आणि इतर शेती उत्पादनाच्या साठवणुकीसाठी आवश्यकतेनुसार साठवणूक केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी धोरणातील अयोग्य गोष्टी स्वीकारणार नाही केंद्राच्या कृषी धोरणाबद्दल बोलताना ठाकरे यांनी  जबरदस्तीने कोणताही कायदा स्वीकारणार नाही असा इशारा देताना कृषी धोरणातील फायदे व त्यामुळे शेतकऱ्यांना बसणारे फटके यावर तज्ञ समितीमार्फत विचार सुरू आहे या धोरणातील अयोग्य गोष्टी कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत असे त्यांनी सांगितले.

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राज्यात सुरु असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.  या मोहिमेत तपासणी करताना अनेक संशयित रुग्ण सापडले आहेत.  त्यांची टेस्ट केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेले आहेत. त्यामुळे कोरोना ला अटकाव करण्यास या मोहिमेची मदत होत आहे असे ठाकरे संगितले.

उघडलेल्या दारातून समृद्धी यायला हवी कोरोना व्हायरस नको
कोरोना संपलेला नाही पण एकेक गोष्टी आपण हळुवारपणे सुरू करत आहोत. मंदिराच्या बाबतीत राजकारण केले जात आहे. मात्र जनतेवर आमचे प्रेम आहे. आमच्यावर जबाबदारी आहे त्यामुळे हळुवार पणे सर्व गोष्टींचा विचार करूनच आम्ही आवश्यक गोष्टी सुरू करत आहोत. उघडलेल्या दारातून समृद्धी यायला हवी कोरोना व्हायरस नको याची खबरदारी आम्ही घेत आहोत.

जिमसाठी ही नियमावली बनवली जात आहे जिम मध्ये व्यायाम करत असताना सर्वांचा श्वास हा जोरात सुरू असतो. त्यात एखादा जरी संशयित रुग्ण असेल तर संसर्ग वेगात पसरू शकतो त्यामुळे जिम सुरू करण्यासंदर्भात नियमावली बनवली जात आहे.

करोना संपलेला नाही त्यामुळे बिनधास्त फिरू नका.शासनाला दिलेल्या सूचनांचे पालन करा. आपण एकेक गोष्टी सुरू करत आहोत परंतु खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत पुन्हा लॉक डाऊन लागेल अशी वेळ आपल्याला आता आणायची नाही. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने खबरदारी घेणे आवश्यक आहे असे आवाहन  ठाकरे यांनी केले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये