पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ विजयी, काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांचा पराभव

पुणे: राज्यातील लक्षवेधी असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून त्या ठिकाणी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव केला आहे.
राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी मतदारसंघांपैकी एक असलेल्या पुण्याच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे. पुणे लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीने झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे हे लोकसभेच्या रिंगणात होते.
देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारत इंडिया आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला.
अनेक मुद्द्यांनी पुणे लोकसभा मतदार संघातील वातावरण प्रचारा दरम्यान तापले होते. त्यामुळे निकालाकडे पुणेकरांचे लक्ष लागले होते. आज मुरलीधर मोहोळ विजय घोषित होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष पुण्याच्या विविध भागात जल्लोष केला.
भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली गेली तर निवडणुकीत रंगत येणार असल्याची चर्चा सुरवातीपासून होती, आणि नेमके तसेच घडले. काँग्रेसने धंगेकर यांना उमेदवार म्हणून घोषित करताच पुण्याची निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित झाले होते.

दिवसागणिक प्रचारा दरम्यान दोन्ही बाजूंनी होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांची, मुद्द्यांची चर्चा मतदारांमध्ये होत होती, त्यामुळे मतदार काय भूमिका घेणार हे उत्सुकतेचे होते. आजच्या निकालानंतर पुणेकरांनी मोहोळ यांना आपला खासदार म्हणून निवडले आहे.
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे गिरीश बापट हे विजयी झाले होते. त्यामुळे बापटांची जागा राखण्याचं आव्हान भाजपसमोर होतं. तर कसबा विधानसभा निवडणुकीत जो निकाल लागला त्याप्रमाणेच धक्कादायक निकाल देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. म्हणूनच महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांच्यासोबत मनसेतून वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेल्या वसंत मोरेंनेही निवडणुकीच्या रिंगणात उतरून रंगत भरली.






