बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे विजयी : सुनेत्रा पवारांचा पराभव..
पुणे : बारामती लोकसभा मतदार संघामध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा एक लाखाहून जास्त मताधिक्य घेत पराभव केला. शरद पवार व अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली गेलेल्या या निवडणुकीत शरद पवार यांनी बाजी मारली व आपणच सरस असल्याचे दाखवून दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर बारामती लोकसभेच्या जागेकडे देशभराचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकीला ननंद विरुध्द भावजय अशी किनार असल्याने भावनिक स्पर्श होता. पक्षामध्ये फूट पडल्यानंतर सर्व पवार कुटुंबीय शरद पवार यांच्याच पाठीशी उभे राहिल्याचे पाहायला मिळाले होते त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते.
अजित पवार यांनीही सुनेत्रा पवार यांना विजयी करण्यासाठी त्यांची पूर्ण यंत्रणा कामाला लावली होती तर शरद पवार यांनी आपल्या एवढ्या वर्षाच्या राजकारणातील अनुभव या निवडणुकीत पणाला लावला आणि तो त्यांच्या कामी आल्याचे निवडणुकीच्या निकालातून दिसून येत आहे.
अजित पवार यांनी पक्षातून बाहेर पडून घेतलेल्या भूमिकेवर मतदार नाराज असल्याचेच हा निकाल स्पष्ट करत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, खडकवासला, मुळशी या भागातून कोण कसे मताधिक्य घेणार यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून होता मात्र या सर्वच भागातून सुप्रिया सुळे यांना पाठिंबा मिळाल्याचे दिसत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचारा दरम्यान झालेल्या आरोप प्रत्यारोपांची चर्चा मतदार संघात चांगलीच रंगत होती. पण अजित पवार यांच्याकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर मात्र मतदार नाराजी व्यक्त करत होते आणि त्याचाच फटका सुनेत्रा पवार यांना या निवडणुकीत बसल्याचे आता बोलले जात आहे.
विधानसभा मतदार संघ निहाय सुप्रिया सुळे यांना मिळालेले मताधिक्की
भोर लीड : 41,625
बारामती लीड :48,168
पुरंदर लीड : 34,387
इंदापूर लीड : 25,689
दौंड लीड : 24,267
खडकवासला – 21,696 (मतांनी मागे)
एकूण मिळालेली मते
सुप्रिया सुळे : 7,28,068
सुनेत्रा पवार : 5,74,538
सुप्रिया सुळे यांना मिळालेले मताधिक्य : 1,53,048