
नवी दिल्ली : प्राप्तिकरात कोणताही बदल न केल्याने नोकरदार व्यक्तीसाठी एक प्रकारे मोठा दिलासाच आहे, असे संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

सरकारने दोन वर्षात आयकराच्या नावाने एक पैसाही वाढवला नाही. म्हणजेच हा देखील एक दिलासाच आहे, असे त्या म्हणाल्या. वित्तीय तूट कितीही असली तरी करोनाच्या या महामारीच्या काळात जनतेवर कराचा बोजा पडू नये, असा आदेश गेल्या वेळी पंतप्रधान मोदींनी दिला होता. तोच आदेश यावेळीही देण्यात आला होता. गेल्या अर्थसंकल्पात तसेच या अर्थसंकल्पातही याची अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे सीतारामन यांनी सांगितले. रिझर्व्ह बँक डिजिटल करन्सी जारी करेल.काळ्या पैशाबाबत अनेक देशांसोबत माहितीची देवाण-घेवाण करण्यात येत आहे, असं सीतारामन म्हणाल्या.