विकासासाठी नागरिकांच्या सहभागातून आणि विश्वासातूनच पुढे जाण्याचा आमचा संकल्प- हर्षवर्धन मानकर

प्रभाग ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोपरा सभांचा धुमधडाका…
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर मधील स्वयंप्रभा सोसायटी, गिरीजा सोसायटी,स्नेह पेरेडाईज सोसायटी तसेच सुतारदरा येथील शिवसाई नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कोपरा सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आजच्या दिवशी प्रभागातील विविध भागांमध्ये एकूण चार कोपरा सभा यशस्वीरीत्या पार पडल्या.
या कोपरा सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिन्ही उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर,तृप्ती निलेश शिंदे, कांता नवनाथ खिलारे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. प्रत्येक सभेत स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभागातील पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, वाहतूक समस्या, आरोग्य सुविधा, महिला व युवकांसाठीच्या योजना यासह विविध स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.नागरिकांनी मांडलेल्या समस्या, सूचना व अपेक्षा काळजीपूर्वक ऐकून घेण्यात आल्या असून त्यांची नोंद करण्यात आली आहे. प्रभागाच्या विकासासाठी या सर्व मुद्द्यांवर प्राधान्याने काम करण्यात येईल, असे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात आले.कोपरा सभांमुळे नागरिकांना थेट आपली मते मांडण्याची संधी मिळत असून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महिलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा तसेच युवकांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता.

यावेळी बोलताना हर्षवर्धन मानकर यांनी सांगितले की, “कोपरा सभा हा नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा प्रभावी माध्यम आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या सहभागातून आणि विश्वासातूनच पुढे जाण्याचा आमचा संकल्प आहे.”प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट केले. तसेच, गेल्या अनेक वर्षांमध्ये आदरणीय दीपकभाऊ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रभागात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती नागरिकांसमोर मांडली. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत नागरी सुविधांच्या माध्यमातून प्रभागाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा देण्यात आला.
या विकासाच्या भक्कम पायावर पुढील काळातही प्रभागाचा सर्वांगीण व गतिमान विकास साधण्यासाठी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी उमेदवारांनी केले. पुढील काळातही प्रभागातील विविध ठिकाणी कोपरा सभा व पदयात्रांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.






