‘पुणेकरांच्या प्रेमाने भारावून गेलो’- मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली कृतज्ञता; रक्तदान शिबिरांतून तब्बल १० हजार रक्तपिशव्यांचे महाअभियानात संकलन

पुणे : शहरात रक्ताचा तुटवडा गंभीर होत असताना, पुणेकरांनी पुन्हा एकदा सामाजिक उत्तरदायित्वाच्या उच्च परंपरेचे जतन करीत, खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान महाअभियानात ५६ रक्तदान शिबिरांमधून तब्बल १० हजार ३३८ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन केले. दरवर्षी होणाऱ्या या उपक्रमाला पुणेकरांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मोहोळ यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
मोहोळ म्हणाले, “पुणेकरांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांचा सहभाग लाभला. हा विश्वास माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे. शहराने पुन्हा एकदा दाखवून दिले की ऐक्य, सहकार्य आणि सामाजिक संवेदनशीलता हीच त्याची खरी ओळख आहे. हजारो पुणेकरांनी घराबाहेर पडून केलेले रक्तदान, हे केवळ वाढदिवसाचे औचित्य नव्हते, तर समाजबंध दृढ करण्याचे प्रतीक होते. मी पुणेकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. पुणेकरांनी दाखवलेले प्रेम म्हणजेच माझी खरी ताकद आहे.

मोहोळ पुढे म्हणाले, “वर्षभरात आपत्कालीन प्रसंगी तत्काळ रक्त उपलब्ध करता यावे यासाठी स्वेच्छेने रक्तदान करण्यास सदैव तयार असलेल्या पुणेकरांची सूची तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या यादीमध्ये विशेषतः दुर्मिळ रक्तगटाचे दाते समाविष्ट केले जातील, ज्याचा थेट लाभ गरजू रुग्णांना मिळू शकेल.”
रक्तदाते आणि रुग्ण यांच्यासाठी एक विशेष ऑनलाईन पोर्टल विकसित करीत आहोत. या पोर्टलवर रक्त देण्यास इच्छुक दाते नोंदणी करू शकतील. गरज पडल्यास रुग्ण किंवा रुग्णालयांना याच प्लॅटफॉर्मवरून थेट संपर्क साधता येईल. यामुळे रक्त मिळवण्यासाठी दवाखान्यांमध्ये किंवा सोशल मीडियावर धावाधाव करावी लागणार नाही.” असे मोहोळ यांनी सांगितले.



