वारजेत रामनगर मध्ये ड्रेनेज लाईनसाठी खोदलेला रस्ता काम झाल्यानंतरही पूर्ववत नाही.. खड्ड्यातून प्रवास नागरिकांना मनस्ताप

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाच्या अश्विनी कांबळे यांनी केली रस्ता काँक्रिट करण्याची मागणी..
वारजे : वारजे मधील रामनगर मधून खान वस्तीकडे जाणारा रस्ता महापालिकेकडून ड्रेनेज लाईनच्या कामासाठी खोदण्यात आला होता. काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरील खोदकाम तर व्यवस्थित बुजवलेच नाही पण रस्ताही तसाच ठेवल्याने या रस्त्याने ये जा करताना वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाच्या अश्विनी किशोर कांबळे यांनी केली आहे.

या संदर्भातील निवेदन आज अश्विनी कांबळे यांनी वारजे कर्वेनगर महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ आढाव यांच्याकडे दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहराचे युवक अध्यक्ष किशोर कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते.



अश्विनी किशोर कांबळे म्हणाल्या रामनगर मधून खान वस्तीकडे गेलेल्या रस्त्याचा नागरिक पर्यायी मार्ग म्हणून वापर करत आलेले आहेत. हा रस्ता ड्रेनेज लाइन साठी खोदला पण पूर्ववत न करता तसाच ठेवल्याने या रस्त्यावर सध्या प्रचंड खड्डे आहेत. या खड्ड्यातून आणि धुळीतून रोज नागरिकांना प्रवास करावा लागत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे आपत्कालीन सेवा पुरवण्यात ही मर्यादा येण्याची भीती आहे. मागील ६-७ महिन्यांपासून ही परिस्थिती आहे. या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आज आम्ही अधिकाऱ्यांची भेट घेत या समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले असून तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.
निवेदन दिल्यानंतर महापालिका सहाय्यक आयुक्त सोमनाथ आढाव यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून योग्य कार्यवाही करून रस्त्याचे तातडीने काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे कांबळे यांनी सांगितले.






