कोथरुड मधील केळेवाडी भागातील ११ वर्षीय विश्वजीत वंजारी याच्या खुनाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश..

कोथरुड : कोथरूड मधील केळेवाडी भागात राहत असलेल्या विश्वजीत विनोद वंजारी (वय ११) या मुलाच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यास कोथरुड पोलिसांना यश आले आहे. खेळात सतत माझ्यावरच राज्य देतो अशा कारणातून एका 13 वर्षीय मुलाने त्याचा खून केला असल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Police succeed in unraveling the murder of 11-year-old Vishwajeet Vanjari in Kelewadi area of Kothrud
याप्रकरणी विश्वजीत च्या आईने कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली होती. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विश्वजीत हा केळेवाडी परिसरातून 29 जानेवारीला बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याचा सर्वत्र शोध चालू होता. पोलिसांकडे ही तक्रार करण्यात आली होती. याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोथरूड पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असताना रविवारी दुपारी केळेवाडी परिसरातीलच एका मोकळ्या जागेवर त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. यावेळी त्याच्या डोक्यावर मारहाण झाल्याचे दिसून आल्याने त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते.
कोथरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भैरव शेळके या प्रकरणाचा तपास करत होते. परिसरात कसून चौकशी केली जात होती. पोलिसांनी विश्वजीत च्या मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली आहे. शेळके यांनी सांगितले की विश्वजीत आणि त्याचा मित्र खेळायला गेले होते. मित्राने विश्वजीतला जोरात ढकलून दिल्यानंतर विश्वजीत खाली पडला. त्यानंतर तो उठला नाही. घाबरलेल्या मित्राने त्याच्यावर दगड विटा लावून तेथून पळ काढला. चौकशीत संबधित मुलाने कबुली दिली आहे.