महाराष्ट्रातील एकमेव महिला दहीहंडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोथरूडमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या दहीहंडीची तयारी पूर्ण

पुणे : महाराष्ट्रातील एकमेव महिला दहीहंडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना व ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या कोथरूडमधील दहीहंडीची तयारी पूर्ण झाली आहे. कोथरूड मधील जीत मैदानावर मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून या दहीहंडी उत्सवाला सुरुवात होणार असल्याचे आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस, नगरसेवक किशोर शिंदे यांनी सांगितले.
दहीहंडी उत्सव जवळ आला की कोथरूड सह पुणे शहरातील महिला, तरुणी यांना ओढ लागते ती आदर स्त्री शक्तीचा..जागर स्त्री शक्तीचा या घोषणेखाली घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना व ओम चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित महिला दहीहंडीची.. कारण या ठिकाणी महिलांना दहीहंडी उत्सवाचा मनसोक्त आनंद घेता येतो. कोथरूड मधील जित मैदानावर सुरक्षित वातावरणात ही दहीहंडी होत असल्याने मोठ्या संख्येने महिला भगिनी या दहीहंडी उत्सवाचा भाग होतात. विशेष म्हणजे येथील दहीहंडी ही दरवर्षी महिला गोपिका पथकाकडूनच फोडली जाते. हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटींची ही या दहीहंडीला विशेष उपस्थिती राहते.

महिलांना दहीहंडी उत्सवाचा सुरक्षित वातावरणात मनसोक्त आनंद घेता यावा यासाठी दरवर्षी या महिला दहीहंडीचे आयोजन केले जात असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस, नगरसेवक किशोर शिंदे यांनी सांगितले. महिलांनाही दहीहंडी उत्सवाचा आनंद घ्यायचा असतो पण आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी तसे वातावरण नसते म्हणून महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे आणि त्यांनाही या उत्सवाचा आनंद घेता यावा या हेतूने महिला दहीहंडी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
या महिला दहीहंडी महोत्सवाचे संयोजन गणेश शिंदे, संजय काळे, श्रीकांत अमराळे, साधू धुमाळ, रवी वाल्हेकर, विश्वास किरमिटे, शशांक अमराळे, धनंजय बलकवडे, प्रतिक कंधारे, प्रकाश अडसूळ, ओंकार तुपे, आकाश बोबडे यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिकांनी केले आहे.












